नियुक्तीपत्राशिवाय वितरण नाही– सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे
रत्नागिरी : मंडळाचे गृहपयोगी वस्तू संच वितरणाचे http://hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाचा वापर करुन गृहपयोगी संच घेण्याकरिता त्याच्या सोईचा दिनांक व तालुका निहाय वितरण केंद्र निवडण्यात यावा. तसेच संकेतस्थळावरुन नियुक्ती पत्र घेण्यात यावे. नियुक्ती पत्राशिवाय वितरण केंद्रावरुन कोणालाही संच वाटप होणार नाही, असे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी कळविले आहे.
गृहपयोगी वस्तू संच वितरणाची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती, या कार्यपध्दतीमध्ये बदल करून सुधारीत कार्यपध्दतीस शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. गृहपयोगी संच वितरणाबाबत खालीलप्रमाणे सुधारीत सुचना देण्यात येत आहेत. सुधारीत पध्दतीनुसार मे. मफतलाल इंडस्ट्रिज लि. मुंबई या नियुक्त संस्थेच्या तालुकानिहाय वितरण केंद्रे वर गृहपयोगी संचाचे वितरण करण्यात येईल. गृहपयोगी संच हा कुटुंब (पती/पत्नी) करिता एकच अनुज्ञेय राहणार आहे. तसेच संबंधित कामगाराने यापुर्वीच गृहपयोगी संच घेतला असेल तर सदर कामगार या योजनेस अपात्र ठरेल. मंडळाचे गृहपयोगी वस्तू संच वितरणाचे http:/hikit.mahabocw.in/appointment या संकेतस्थळाचा वापर करुन गृहपयोगी संच घेण्याकरीता त्याच्या सोईचा दिनांक व तालुका निहाय वितरण केंद्र निवडण्यात यावा. तसेच संकेतस्थळावरुन नियुक्ती पत्र घेण्यात यावे.
बांधकाम कामगार मंडळाचे ओळखपत्र, आधारकार्ड व संकेतस्थळावरून मिळालेले नियुक्ती पत्र घेवून त्याने निवडलेल्या दिनांकास वितरण केंद्रावर उपस्थित राहून तिथे Biometric व online Photo देऊन गृहपयोगी संच ताब्यात घेवून पोहोच द्यावी. प्रत्येक वितरण केंद्राचा प्रतिदिवसांचा गृहपयोगी संच वितरणाचा लक्ष्यांक ५०० करण्यात आलेला आहे. नियुक्ती पत्राशिवाय वितरण केंद्रावरुन कोणालाही संच वाटप होणार नाही. आठवडयाचे दर शनिवार व रविवार व शासकीय सुट्या वगळून संच वाटप करण्यात येईल.
वाटप हे विनामुल्य वितरीत करण्यात येणार असून याबाबतीत एजंट, दलाल, अगर तत्सम व्यक्तीद्वारे पैशाची मागणी केली जात असल्यास नजिकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करावी.
तरी वितरणाच्या ठिकाणी गृहपयोगी संच वाटप कोणतीही गर्दी – गोंधळ न करता शिस्तबध्द व नियोजनपुर्वक पार पाडले जाईल याची जबाबदारी घ्यावी, असेही आवाहन सहाय्यक कामगार आयुक्तांनी केले आहे.






