मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे झालेल्या ४,५३१ प्रवाशांच्या मृत्यूंना अपघाती नव्हे, तर ‘खून’ मानत, ‘जन आक्रोश समिती’ने सरकार आणि कंत्राटदारांवर थेट ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या गंभीर मागणीसाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी समितीने यंदाचा गणेशोत्सव मुंबई-गोवा महामार्गावरच ‘मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
समितीच्या मते, २०१० पासून महामार्गाचे काम सुरू असूनही ते अजूनही अपूर्ण आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांनी आपले सदस्य गमावले आहेत. हे मृत्यू केवळ निष्काळजीपणामुळे झाले नसून, ते सरकार आणि ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडले आहेत, असा समितीचा ठाम आरोप आहे. त्यामुळे, या मृत्यूंना ‘खून’ मानून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. याशिवाय, मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सारख्या सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळावी, अशीही समितीची मागणी आहे.
सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी समितीने गणपती उत्सवाचा मार्ग निवडला आहे. या आंदोलनाची सुरुवात १० ऑगस्ट रोजी पनवेल-पळस्पे येथे ‘पाटपूजन सोहळ्या’ने होईल. १७ ऑगस्ट रोजी पेण येथे ‘पाद्यपूजन सोहळा’ पार पडेल. त्यानंतर २७ ऑगस्ट, म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लांजा येथे प्रत्यक्ष गणेशोत्सवाला सुरुवात होईल.
हा उत्सव महामार्गावरील विविध महत्त्वाच्या ठिकाणी साजरा केला जाईल. २८ ऑगस्ट रोजी पाली-रत्नागिरी, २९ ऑगस्ट रोजी संगमेश्वर डेपो, ३० ऑगस्ट रोजी चिपळूण-बहादूर शेख नाका, ३१ ऑगस्ट रोजी खेड रेल्वे स्टेशन जवळ, १ सप्टेंबर रोजी पोलादपूर, २ सप्टेंबर रोजी लोणेरे, माणगाव आणि इंदापूर येथे तर, ३ सप्टेंबर रोजी कोलाड, ४ सप्टेंबर रोजी नागोठणे आणि ५ सप्टेंबर रोजी पळस्पे येथे महाआरती आणि अन्य कार्यक्रम होतील. आंदोलनाचा समारोप ६ सप्टेंबर रोजी वर्षा बंगल्यावर केला जाईल. या अनोख्या आंदोलनातून सरकार या समस्येवर काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.