GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत तरुणाला ५.३३ लाखांचा ऑनलाइन गंडा

Gramin Search
11 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिग्राम ॲपवरून ‘जी श्री कृष्णा’ नावाच्या प्रोफाइल असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील आंबेडकर रोड, धनजीनाका येथील रहिवासी माझ एजाज सुभेदार ( २८, व्यवसाय नोकरी) हे दि. १४/०६/२०२५ ते दि. १७/०६/२०२५ या कालावधीत टेलिग्राम ॲपवर ‘जी श्री कृष्णा’ नावाच्या अज्ञात व्यक्तीच्या संपर्कात आले. या आरोपीने सुभेदार यांना ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला फिर्यादी सुभेदार यांनी गुंतवलेली लहान रक्कम आरोपीने नफ्यासह परत केली, ज्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला.
या विश्वासानंतर आरोपीने दिलेल्या यूपीआय आयडी आणि बँक खात्यांवर फिर्यादी सुभेदार यांनी त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यातून १ लाख ७५ हजार रुपये तर त्यांचा मित्र अजमल साजीद सोलकर यांच्या बँक खात्यातून ३ लाख ५८ हजार रुपये असे एकूण ५ लाख ३३ हजार रुपये जमा केले. मात्र, यानंतर जेव्हा फिर्यादीने आपली गुंतवलेली आणि नफ्याची रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपीने रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली आणि त्यांची फसवणूक केल्याचे सभेदार यांच्या निदर्शनास आले.

घडलेल्या प्रकारानंतर माझ सभेदार यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी ‘जी श्री कृष्णा’ नावाच्या टेलिग्राम प्रोफाइलचा वापर करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Total Visitor Counter

2647006
Share This Article