रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणी वाडीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल (साकव) नसल्याने होणारी अडचण अखेर दूर झाली आहे. ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या या समस्येची दखल घेत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी पुलाच्या बांधकामासाठी 30 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, नदीतून मृतदेह न्यावे लागतात’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याची गंभीर दखल पालकमंत्री डॉ. सामंत यांनी घेतली. आमदार शेखर निकम यांनी या पुलासाठी 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी मागणीला तात्काळ प्रतिसाद देत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत हा निधी मंजूर केला. तसेच, पुढील प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या निधीमुळे आता स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार होणार असून, वाणी वाडीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.