राजापूर: रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी पहाटे मोठी कारवाई करत राजापूर येथे गोवा राज्यातून आणलेली सुमारे बावीस लाख रुपयांची अवैध दारू जप्त केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा राज्यातून मुंबईकडे अवैधरित्या दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राजापूर बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सापळा रचला. संशयास्पद हुंडाई क्रेटा (क्र. MH 07 AS 3458) या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली, मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची एकूण ७७ बॉक्स दारू (६६५.८ बल्क लिटर) आढळून आली.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ७,१९,७६० रुपये असून, संबंधित वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत २२,१९,७६० रुपये इतकी आहे. याप्रकरणी वाहनचालक बस्त्याव सायमन घोन्सालविस (रा. होडावडा, ख्रिश्चनवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ), ६५ (ई) आणि ९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, तसेच विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईदरम्यान निरीक्षक अमित पाडळकर यांच्यासोबत दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, जवान वैभव सोनावळे, वाहनचालक मलिक धोत्रे, मानस पवार, सागर टिकार, निलेश तुपे आणि विशाल भोसले या पथकात सहभागी होते. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.
राजापूर येथे गोव्याहून आणलेली २२ लाखांची अवैध दारू जप्त; एकाला अटक
