दापोली : तालुक्यातील गोरीवलेवाडी, कोढे येथे कुत्र्याच्या विष्ठेवरून सुरू झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या घटनेमुळे दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. २४ जून रोजी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
हा वाद २४ जून रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता गोरीवलेवाडी, कोढे येथे सुरू झाला. रुपेश वसंत गावडे (वय ३५, व्यवसाय शेती) हे आपल्या घराची साफसफाई करत असताना शेजारी राहणाऱ्या महादेव जानू रेवाळे यांचा कुत्रा त्यांनी साफ केलेल्या जागेत येऊन शौचाला बसला. यामुळे संतापलेल्या गावडे यांनी कुत्र्याला काठी फेकून मारले. महादेव रेवाळे यांनी हे आपल्या शेतातून पाहिले आणि त्यांनी गावडे यांना जाब विचारला.
यावेळी, “तू माझ्या कुत्र्याला कशाला मारलेस?” असे रेवाळे यांनी विचारले असता, “तुमचा कुत्रा माझ्या घरासमोर रोज संडास करतो, म्हणून मी त्याला मारले,” असे गावडे यांनी उत्तर दिले. यावर रेवाळे यांनी, “तुझ्या घराजवळ जाणारा रस्ता तुझ्या बापाचा आहे का?” असे विचारले. “हा रस्ता माझाही नाही आणि तुझ्याही बापाचा नाही,” असे रुपेश गावडे यांनी बोलल्यानंतर महादेव रेवाळे यांचा पारा चढला.
पहिला हल्ला: गावडे कुटुंबाला मारहाण
संतप्त झालेल्या महादेव रेवाळे यांनी रुपेश गावडे यांना शिवीगाळ करत झटापट केली. त्यांनी हाताने मारहाण केली आणि त्यांच्या हातात असलेल्या सऱ्याने रुपेश गावडे यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी मारून दुखापत केली. यावेळी रुपेश गावडे यांची पत्नी राजा रुपेश गावडे, तसेच शेजारी स्मिता जयवंत राजीवले आणि अनुराग जयवंत राजीवले सोडवण्यासाठी आले असता, आरोपी महादेव रेवाळे यांनी त्यांनाही हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली.
या प्रकरणी रुपेश वसंत गावडे यांनी २५ जून रोजी दुपारी २.०९ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी महादेव रेवाळे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दुसरा हल्ला: रेवाळे यांना पाच जणांकडून मारहाण
याच वादातून दुसऱ्या बाजूनेही गुन्हा दाखल झाला आहे. २४ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेप्रकरणी महादेव जानू रेवाळे (वय ५८, व्यवसाय शेती) यांनी २५ जून रोजी रात्री ७.१२ वाजता दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रेवाळे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या कुत्र्याने रुपेश वसंत गावडे यांच्या घरासमोर रस्त्यावर शौच केल्याच्या कारणावरून रुपेश वसंत गावडे यांनी महादेव रेवाळे यांच्या डाव्या कानशिलात मारले. तसेच, त्यांच्या हातातील जाड बांबूच्या काठीने डोक्याच्या डाव्या बाजूवर फटका मारून त्यांना जखमी केले. यावेळी रुपेश गावडे यांच्यासोबत विठ्ठल बाबू राजीवले, जयवंत पांडुरंग राजीवले, अनुराग जयवंत राजीवले आणि दिलीप दशरथ करंजकर (सर्व रा. कोढे, गोरीवलेवाडी) यांनीही महादेव रेवाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याचे रेवाळे यांनी म्हटले आहे.
या घटनेनंतर महादेव जानू रेवाळे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), १८९(२), १११(२), १९० प्रमाणे गुन्हा क्रमांक ११९/२०२५ दाखल केला आहे. या प्रकरणात रुपेश वसंत गावडे यांच्यासह एकूण पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे.
दापोली पोलीस दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या या परस्परविरोधी तक्रारींचा अधिक तपास करत आहेत. कुत्र्याच्या विष्ठेसारख्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या हाणामारीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.