चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील गार्गी संस्था ही केवळ नावापुरती नव्हे तर कृतीतून समाजासाठी कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. शिक्षण, सामाजिक भान आणि मानवतेची जपणूक हे ब्रीद ठेवून या संस्थेने आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजूंना मदत आणि समाजोपयोगी उपक्रमांत सातत्य ठेवणाऱ्या या संस्थेने नुकतेच आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पाऊल टाकत देवरुख व रत्नागिरी येथील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. राहुल थोरात, भालचंद्र गायकवाड, राकेश कदम, सुनील सावत, प्रा. स्वाती पवार, सुजल गोपाळे आणि प्रा. एम. एन. पाटील हे केवळ पदाधिकारी नसून खऱ्या अर्थाने समाजसेवक आहेत. स्वतःच्या पगारातून काही रक्कम वेगळी ठेवून ती गरजूंवर खर्च करण्याचा त्यांचा संकल्प खरोखरच प्रेरणादायी आहे. वैयक्तिक सुखसोयीपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य देणाऱ्या या भूमिकेमुळेच गार्गी संस्थेची ओळख ‘मनाने श्रीमंतांची’ झाली आहे.
रत्नागिरीतील पत्रकार समीर शिगवण यांनी गार्गी संस्थेकडे गरीब विद्यार्थ्यांना वह्या–पुस्तके मिळवून देण्याची विनंती केली होती. संस्थेने ही विनंती तात्काळ मान्य करून नुकतेच देवरुख आणि रत्नागिरी येथील दहा विद्यार्थ्यांना लाँग बुकचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही आनंद व्यक्त केला असून संस्थेच्या समाजाभिमुख कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सावर्डेतील ‘गार्गी संस्थे’तर्फे देवरुख, रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
