राजापूर (तुषार पाचलकर): ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी आणि शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी राजापूर तालुक्यात एक अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. तळवडे येथील सुगंधी व समृद्ध विकास मंच आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पितांबरी इस्टेट येथे माळी प्रशिक्षणाला दिमाखदार सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणात १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांना एका वर्षाच्या कालावधीत कृषी क्षेत्रातील विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामागे पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन आहे. ग्रामीण तरुणांनी नोकरीच्या शोधात शहरांकडे न जाता, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वयंपूर्ण व्हावे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कौशल्ये शिकवली जाणार आहेत. यामध्ये आंबा, काजू, कोकम, जांभूळ, नारळ आणि काळीमिरीसारख्या महत्त्वाच्या पिकांच्या कलमांची निर्मिती व संगोपन कसे करावे, तसेच केळीसारख्या पिकांसह बागकामाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक बॉन्साय कसे तयार करावे, याचे मार्गदर्शन केले जाईल. त्याचबरोबर, सेंद्रिय खतांचे महत्त्व, ती कशी तयार करावी आणि त्यांचा प्रभावी वापर कसा करावा, यावर विशेष भर दिला जाईल. विद्यार्थी स्वतः नर्सरी तयार करण्याचे आणि ती यशस्वीपणे चालवण्याचे प्रशिक्षण घेतील, ज्यामुळे त्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल.
याच कार्यक्रमाच्या अंतर्गत, पितांबरी कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. ‘मधाचे गाव’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी कंपनीने आपल्या इस्टेटमध्ये मधमाशांच्या १०० पेट्या अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिकांना मध उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा आणि मधमाशी पालन उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे राजापूर तालुक्याच्या कृषी आणि आर्थिक विकासाला निश्चितच एक नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.