चिपळूण : कै.सिताराम नारायण देशपांडे यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त कृतज्ञता मंच दुर्गेवाडी तालुका – चिपळूण ,जिल्हा – रत्नागिरी यांचे वतीने आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कल्पनेतून देण्यात येणारा जिल्हास्तरीय ” क्रीडारत्न पुरस्कार 2025 ” हा परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री.समीर चंद्रकांत कालेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी जिल्हाभरातून एकूण 26 क्रीडा शिक्षकानी आपल्या कार्याचा अहवाल कृतज्ञता समितीकडे सादर केलेला होता. या सर्व अहवालातून श्री.समीर कालेकर यांची समितीच्या वतीने त्यांनी दिलेल्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल या “क्रीडारत्न पुरस्कार” साठी निवड करण्यात आली आहे.त्यांना हा पुरस्कार कृतज्ञता मंचाचे अध्यक्ष श्री. शांताराम देशपांडे,ॲड.प्रसाद देशपांडे (मुंबई हायकोर्ट), जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.विजय शिंदे,श्री.राहुल टोपले,अध्यक्ष मिशन ऑरगॅनिक एग्रीकल्चर चंदगड,रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री.उदयराज कळंबे,सचिव श्री.राजेश जाधव यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिना दिवशी , साई मंदिर हॉल , गोडाऊन स्टॉप,नाचणे तालुका जिल्हा-रत्नागिरी येथे सन्मानपूर्व पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
श्री.समीर कालेकर हे एक उत्कृष्ट क्रीडाशिक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. ते स्वतः खेळाडू असून कबड्डी खेळाचे नावाजलेले राष्ट्रीय पंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून युनायटेड इंग्लिश स्कूल मधील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे प्रतिनिधित्व करत आले आहेत.
सध्या ते चिपळूण तालुका क्रीडा समन्वयक म्हणून क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत कार्यरत असून अनेक खेळाडू व क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत.त्यांना दिला जाणारा हा जिल्हास्तरीय “क्रीडारत्न” पुरस्कार रोख रक्कम रुपये 5000/- ,सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ अशा स्वरूपात दिला जाणार आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री.उदयराज कळंबे,उपाध्यक्ष प्रसाद शिवणेकर आणि श्री. सत्यवान धोत्रे,सचिव श्री.राजेश जाधव, खजिनदार श्री.संजीव मोरे यांनी अभिनंदन केले आहे.







