GRAMIN SEARCH BANNER

पावसाळ्याच्या बेगमीसाठी संगमेश्वरचा आठवडा बाजार गर्दीने फुलला; ‘अगोट’च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

संगमेश्वर / एजाज पटेल: कोकणच्या मातीत पावसाळा सुरू होण्यापूर्वी केली जाणारी चार महिन्यांची शिदोरी म्हणजेच ‘अगोट’ची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, याचा प्रत्यय बुधवारी संगमेश्वरच्या आठवडा बाजारात पाहायला मिळाला. पावसाळा तोंडावर आल्याने यावर्षीच्या हंगामातील खरेदीसाठी संगमेश्वर बाजारपेठेत ग्राहकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. रत्नागिरीसह शेजारच्या जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली असून, पावसाळ्याच्या बेगमीसाठी लागणाऱ्या साहित्यामुळे संपूर्ण बाजारपेठ सकाळपासूनच गजबजून गेली होती.

कोकणात पावसाळ्यात सलग पडणाऱ्या पावसामुळे आणि वाहतुकीच्या संभाव्य अडचणींमुळे ग्रामीण भागातील जनता वर्षभराचे तिखट-मसाले आणि टिकणारा भाजीपाला साठवून ठेवण्याला प्राधान्य देते. याच पार्श्वभूमीवर आजच्या बाजारात कांदे, बटाटे आणि लसूण यांसारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा मोठा ओढा दिसून आला. तसेच कोकणी जेवणाची लज्जत वाढवणारे गरम मसाले आणि विविध प्रकारच्या लाल सुक्या मिरच्या खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची मोठी गर्दी बाजारपेठेत दिसत होती. पावसाळी दिवसात ताज्या भाज्यांची कमतरता भासत असल्याने घरात साठवणूक करण्यासाठी हा बाजार म्हणजे ग्रामीण भागातील लोकांसाठी मोठा आधार ठरला आहे.

खाद्यपदार्थांसोबतच सुक्या मासळीच्या बाजारातही सोडे, सुकट आणि वाकटी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूच नव्हे, तर पावसापासून संरक्षणासाठी लागणाऱ्या ताडपत्री आणि शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी लागणारी स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पालकांनीही मोठी उपस्थिती लावली होती. तालुक्यातील गावागावातून आलेल्या लोकांमुळे आणि व्यापाऱ्यांनी आणलेल्या वैविध्यपूर्ण मालामुळे संगमेश्वर बाजारपेठ आर्थिक उलाढालीचे मुख्य केंद्र बनली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होण्याचे संकेत असल्याने पावसाळ्याची ही बेगमी पूर्ण करण्यासाठी लोकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

Total Visitor Counter

3440500
Share This Article