लांजा/अरबाज नेवरेकर : प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविणारी घटना लांजा तालुक्यात घडली आहे. केळंबे येथील रिक्षाचालक तथा शिवसेना बूथ प्रमुख सचिन अनंत इंगळे यांनी हरवलेले पाकीट त्याच्या मालकाला सुखरूप परत करून आदर्श निर्माण केला आहे.
वेरवली येथील दिव्यांग नागरिक श्री. जितेंद्र विठोबा डोळस हे रविवार, दि. ३१ मे रोजी वेरवली ते लांजा असा प्रवास करत असताना केळंबे परिसरात त्यांचे पाकीट रिक्षातून पडले. पाकिटामध्ये महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम होती. पाकीट हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची मोठी धावपळ सुरू झाली.
दरम्यान, हे पाकीट केळंबे येथील रिक्षाचालक सचिन अनंत इंगळे यांना सापडले. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत पाकीट आमदार किरण सामंत यांच्या लांजा येथील शिवसेना शाखेत जमा केले. त्यानंतर श्री. जितेंद्र डोळस यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाखेत बोलावण्यात आले.
युवा सेना प्रमुख राजेंद्र धावणे तसेच भिकाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत पाकीट श्री. डोळस यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. पाकिटातील सर्व कागदपत्रे आणि रोख रक्कम सुरक्षित असल्याने श्री. डोळस यांनी आनंद व्यक्त करत सचिन इंगळे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
रिक्षाचालक सचिन इंगळे यांच्या या प्रामाणिक कृतीचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या वर्तनातून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.
रिक्षाचालक सचिन इंगळे यांचा प्रामाणिकपणा; दिव्यांग नागरिकाचे हरवलेले पाकीट केले परत





