रत्नागिरी : संचमान्यतेविरोधात माध्यमिक शिक्षकांचे ५ डिसेंबरला शाळा बंद आंदोलन

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: शासनाच्या संचमान्यतेविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी येत्या ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार होणाऱ्या संचमान्यतेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समन्वय समितीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटनांनी घेतला. बैठकीला उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी जिल्ह्यातील शाळा टिकविण्यासाठी या संचमान्यतेवर बहिष्कार टाकणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बहिष्कार आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बहिष्कार आंदोलनामध्ये ठरल्याप्रमाणे संचमान्यतेसंदर्भातील शाळेची कोणतीही माहिती शिक्षणाधिकारी कार्यालय अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयास देण्यात येऊ नये, संचमान्यतेस उपस्थित राहू नये, असे ठरले. बहिष्काराचे रीतसर पत्र समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच समन्वय समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयांमध्ये रिट पिटिशनही दाखल करण्यासंदर्भातील निर्णय यावेळी घेण्यात आला.

येत्या ५ डिसेंबर रोजी होणारे शाळा बंद आंदोलन जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष आयुब मुल्ला आणि सचिव सागर पाटील यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *