GRAMIN SEARCH BANNER

फुणगूस खाडीभाग दाट धुक्याच्या पांढऱ्या चादरीत लपेटला; थंडीचा गारवा पुन्हा वाढला

Gramin Varta
76 Views

संगमेश्वर /एजाज पटेल : फुणगूस खाडीभागातील पहाट सध्या दाट धुक्यामुळे विलक्षण निसर्गसौंदर्य घेऊन अवतरताना दिसत आहे. काही दिवसांपासून गायब झालेली हुडहुडी भरवणारी थंडी पुन्हा एकदा जाणवू लागली असून, सकाळच्या वेळी संपूर्ण खाडीभाग दाट धुक्याने वेढलेला पाहायला मिळत आहे. जणू काही पांढऱ्या मखमली चादरीने खाडीभाग पूर्णपणे झाकला असावा, असे दृश्य या दिवसांत अनुभवायला मिळत आहे.

सकाळच्या पहाटेपासूनच खाडी, आजूबाजूची झाडी, रस्ते आणि दूरवरचा परिसर सर्वच काही धुक्यात हरवलेला भासत होता. वातावरणातील या बदलामुळे तापमानात लक्षणीय घट जाणवत असून, थंडीचा गारवा पुन्हा वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गार वाऱ्याच्या झुळुकींसोबतच दाट धुक्यामुळे संपूर्ण परिसरात शांत आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.

या दाट धुक्याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवरही होताना दिसून आला. सकाळच्या वेळेस दृश्यमानता अत्यल्प झाल्याने वाहनचालकांना वाहनांचे लाईट सुरू ठेवून अतिशय सावधपणे वाहन चालवावे लागत होते. काही ठिकाणी समोरचा रस्ता स्पष्ट न दिसल्याने वाहनांचा वेग कमी करूनच प्रवास केला जात होता. संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांकडून अधिक काळजी घेतली जात असल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

मात्र दाट धुक्यामुळे निर्माण झालेले हे दृश्य अनेकांसाठी आकर्षणाचे ठरले. खाडीवरील शांत पाणी, धुक्यातून डोकावणारी झाडांची रांग, थंडगार वातावरण आणि गार वाऱ्याची झुळूक यामुळे परिसर अधिकच मनमोहक भासत होता. या अद्भुत निसर्गसौंदर्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत अनेक वाहनचालक व प्रवासी थांबताना दिसून आले आणि नंतर पुढील प्रवास सुरू केला.
हवामानातील अधूनमधून होणारे बदल, वाढलेली थंडी आणि दाट धुके यामुळे खाडीपरिसरातील निसर्ग अधिक खुलून दिसत असून, पहाटेचा अनुभव वेगळाच ठरत आहे. स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनाही या वातावरणाचा आनंद घेण्याची संधी मिळत आहे.

या बातमीसोबत लावण्यात आलेला व्हिडिओ संगमेश्वर येथील संजय कदम यांनी टिपलेला असून, त्यामधून फुणगूस खाडीभागातील दाट धुके, थंडीचा गारवा आणि निसर्गसौंदर्याचे मोहक दर्शन घडते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

Total Visitor Counter

3368952
Share This Article