रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुहागर येथे एका इसमाला बेकायदा शस्त्रांसह रंगेहाथ अटक केली आहे. संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून बंदूक, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि त्यांच्या वापराविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मार्च २०२६ रोजी एक पथक गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. गुहागर ते शृंगारतळी जाणारे रस्त्यावर पथक गस्त घालत असताना संशयित आरोपी संजय फनगुसकर हा मोटारसायकलवरून शस्त्रे घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा आणि ८ जिवंत काडतुसे असा घातक साठा सापडला.
या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेली शस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम (आर्म्स ॲक्ट) १९५९ च्या कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत आणि चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांच्या पथकाने पार पाडली. या घटनेचा अधिक तपास गुहागर पोलीस करत असून ही शस्त्रे त्याने कोठून आणली आणि त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा तांत्रिक तपास आता पोलीस करत आहेत.





