GRAMIN SEARCH BANNER

दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचा बळी: उपचारा अभावी महिलेचा मृत्यू

Gramin Varta
85 Views

गडचिरोली: राज्यात डिजिटल प्रगतीच्या गप्पा रंगत असताना गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील कांदोळी येथील मीरा गणेश लेखामी (२५) यांचा विषबाधेनंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला.या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मीरा यांनी ४ मे रोजी दुपारी सुमारास विष प्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर होताच नातेवाईकांनी तातडीने रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्गम भागामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांना दुचाकीवरून सुमारे ६ किलोमीटरचा खडतर प्रवास करत बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतरही अडचणींचा सामना करावा लागला. डॉक्टरांनी उपचार सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु विष बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले सक्शन मशीन नादुरुस्त असल्याचे आढळले. त्यामुळे तिथे उपचार करणे अशक्य ठरले.

यानंतर मीरा यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथे रुग्णवाहिका चालक अनुपस्थित असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. अशा वेळी एका स्थानिक तरुणाने पुढाकार घेत रुग्णवाहिका चालवत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णालय गाठले.

एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी ऑक्सिजन आणि इतर उपचारांच्या माध्यमातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारासाठी झालेला विलंब आणि प्रवासातील धक्क्यांमुळे अखेर त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना केवळ एक अपघात नसून, दुर्गम भागातील मोडकळीस आलेल्या आरोग्य व्यवस्थेचे गंभीर चित्र समोर आणणारी आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता तरी सरकारने या भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

Total Visitor Counter

3362530
Share This Article