GRAMIN SEARCH BANNER

वाशिष्ठी कृषी महोत्सवात पाळीव प्राण्यांचाही होणार जल्लोष!

Gramin Varta
168 Views

7 जानेवारीला ‘कॅट शो’ तर 8 जानेवारीला रंगणार ‘डॉग शो’

आकर्षक बक्षिसांसह स्पर्धांची पर्वणी

चिपळूण (प्रतिनिधी): वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव 2026 मध्ये यंदाही प्राणीमित्र आणि पाळीव प्राण्यांसाठी खास आकर्षण ठरणाऱ्या ‘कॅट शो’ आणि ‘डॉग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. 7 जानेवारी रोजी कॅट शो तर 8 जानेवारी रोजी डॉग शो संपन्न होणार असून, या स्पर्धांमुळे कृषी महोत्सवाला वेगळीच रंगत येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या प्राणी मालकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग तिसऱ्या वर्षी हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 5 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात होणारा हा कृषी महोत्सव शेती, पशुधन, आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नागरिक, युवक व लहानग्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. गतवर्षी प्रथमच कॅट शो व डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्राणीमित्रांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदाही प्राणीमित्र आणि पाळीव प्राण्यांचा जल्लोष पाहण्याची संधी रसिकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे. हे दोन्ही शो 7 जानेवारी आणि 8 जानेवारी या दोन्ही दिवशी सायंकाळी 5 वाजता महोत्सवाच्या ठिकाणी पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्याकरिता इच्छुकांनी 2 जानेवारीपर्यंत 9422661197 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी प्राण्यांचे वय किमान अडीच महिने असणे आवश्यक. त्यांची सुरक्षितता व देखभाल ही संबंधित मालकांची जबाबदारी राहणार आहे.

विविध स्पर्धा, प्रदर्शने, खाद्य पदार्थांची रेलचेल, तंत्रज्ञान व मनोरंजन यांचा संगम असलेला वाशिष्ठी कृषी महोत्सव 2026 हा शेतकरी, पशुपालक व नागरिकांसाठी ज्ञान व आनंदाची पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोफत रेबिज लसीकरण
दरम्यान, वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय विभागाच्या वतीने श्वान व मांजरींसाठी मोफत रेबिज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ पशुपालकांनी घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय सोनवणे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3369399
Share This Article