मुलांना नवनिर्मितीचा आनंद देण्यासाठी पैसा फंडचा उपक्रम
संगमेश्वर ( प्रतिनिधी ):- प्रथम सत्राची परीक्षा झाली , की मुलांना वेध लागतात ते दिपावलीच्या सुट्टीचे . सध्याचा जमाना हा तयार वस्तू घेण्याचा असल्याने मुलांना आकाशकंदील तयार करणे , किल्ल्यांची वैविध्यपूर्ण उभारणी करणे अशा जून्या परंपरा काहीशा विस्मरणात गेल्या असल्याने परीक्षा झाल्यानंतर लगेचच दोन दिवस संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील सारे विद्यार्थी किल्ले , आणि रांगोळी घालण्यात रमले होते . गत दोन दिवसात विद्यार्थ्यांनी आपल्यातील आगळावेगळा कलाविष्कार सादर करुन मनमुराद आनंद लुटला .
परीक्षा झाल्यानंतर मुलांना थोडा विरंगुळा हवा याच बरोबर मुलांमधील सुप्त गुणांना वाव देत, नवनिर्मितीचा आनंद देण्यासाठी संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने यावर्षी दिवाळी सुट्टी पूर्वी दोन दिवस शाळेच्या परिसरातच किल्ले बनविणे , याच बरोबर सुंदर सुंदर रांगोळ्या घालण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते . पाचवीतील मुलांपासून बारावी पर्यंतची मुले या कामात अशी काही मग्न झाली , की त्यातून विद्यार्थ्यांमधील आगळ्यावेगळ्या कलेचा आविष्कार पहायला मिळाला .
मुलांचे चिमुकले हात दगड आणण्यात , माती कालवण्यात , कागदकाम करण्यात कमालीचे व्यस्त झाले . कोणाच्या गालाला माती लागत होती तर कोणाच्या कपड्यांना मात्र या कशाचीही तमा न करता मुलांनी आपले लक्ष केंद्रित केले होते , ते आपल्या कलाविष्कारावर ! पाचवी ते बारावीच्या मुलांनी एकत्र येवून दहा किल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या . किल्ल्यांची रचना कशी असते याचा अभ्यासही यामुळे मुलांना करता आला . प्रशालेतील मुलींनी एकत्र येत ३० पेक्षा अधिक नेत्रदीपक अशा रांगोळ्या घातल्या . सुट्टीला जाण्यापूर्वी गेले दोन दिवस प्रशालेतील मुले अशा वेगळ्या उपक्रमात रमून त्यांनी आनंद घेतल्यामुळे पालकवर्गानेही पैसा फंडच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे . संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी सर्व विद्यार्थी , मार्गदर्शक शिक्षक , सर्व वर्गशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे .
___________________________________
विद्यार्थ्यांच्या हातून नवनिर्मिती साकारण्याचा प्रयत्न
व्यापारी पैसा फंड संस्थेने अभ्यासाबरोबरच मुलांच्या कलाविष्काराला प्राधान्य देण्यासाठी तसेच मुलांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यातील विविध संकल्पना साकारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे इतिहासाबाबत चे ज्ञान वाढावे यासाठी दीपावली सुट्टी पूर्वी सलग दोन दिवस विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्राधान्य देता यावे म्हणून किल्ले तयार करणे , रांगोळ्या घालणे असा उपक्रम राबविला असल्याचे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी सांगितले .
____________________________________
( छाया : मिनार झगडे , संगमेश्वर )
परीक्षा संपताच किल्ले बनविण्यात पैसा फंडचे बालदोस्त रमले !
