साखरपा/ सिकंदर फरास: साखरपा-भडकंबा गावचे उपसरपंच आणि शिवसेना युवासेना तालुका प्रमुख श्री. केतन जी दुधाणे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून ‘माणुसकी’चा आदर्श घालून दिला आहे. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचवणाऱ्या दुधाणे यांनी, आपल्या भागातील एक ज्येष्ठ व्यक्ती श्री. चंद्रकांत रामचंद्र कानावजे यांच्या गंभीर उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल रु. ५०,०००/- ची महत्त्वपूर्ण मदत मिळवून दिली.
श्री. कानावजे यांना उपचारासाठी तातडीच्या आर्थिक मदतीची गरज होती. ही बाब लक्षात येताच, उपसरपंच केतन दुधाणे यांनी तत्काळ पाऊले उचलली आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोठी रक्कम त्वरित मंजूर झाली आणि रुग्णाच्या उपचाराला मोठा आधार मिळाला.
वडिलांच्या उपचारासाठी मिळालेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल श्री. चंद्रकांत कानावजे यांचे सुपुत्र श्री. सागर चंद्रकांत कानावजे यांनी उपसरपंच केतन जी दुधाणे यांचे विशेष आभार मानले. “आदरणीय उपसरपंच श्री. केतनजी दुधाणे यांच्या विशेष सहकार्याचा यात मोठा वाटा आहे,” असे त्यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले. तसेच, सागर कानावजे यांनी दुधाणे यांना उदंड आयुष्य लाभो असा आशीर्वादही दिला.
केतन दुधाणे हे केवळ एक लोकप्रतिनिधी नसून, ते आपल्या भागातील गरजू लोकांसाठी कायमच मदतीचा हात देत असतात. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि अंमलबजावणी करून ते सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मिळवून दिलेली ही मदत केवळ आर्थिक नसून, एका कुटुंबाला मिळालेले भावनिक बळ आहे.
या यशस्वी प्रयत्नानंतर उपसरपंच श्री. केतन दुधाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार श्री. किरण भय्या शेठ सामंत आणि अपूर्वा किरण सामंत यांचेही विशेष आभार मानले. या मदतीसाठी शासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळेच हे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.
उपसरपंच केतन दुधाणे यांचे हे कार्य म्हणजे खऱ्या लोकसेवेचे आणि मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या या मोलाच्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करत, देव त्यांच्या कार्याला अधिक बळ देवो अशी प्रार्थना संपूर्ण साखरपा-भडकंबा भागातून व्यक्त होत आहे.