रत्नागिरी: नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणे आणि पोलिसांकडून माहिती मिळणे सोपे व्हावे, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी तीन नवे उपक्रम जाहीर केले आहेत. गुन्ह्याचा तपासाची प्रगती फिर्यादीला व्हॉट्सअॅपवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज (९ जुलै) पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. फिर्यादीला गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी मिळावी, यासाठी ‘मिशन प्रगती’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासकार्याच्या प्रत्येक टप्प्याची माहिती फिर्यादीला मेसेज किंवा व्हॉट्सअॅपद्वारे कळवली जाणार आहे. फिर्यादीकडे मोबाइल नसला, तर ही माहिती पत्राद्वारे पाठवली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘मिशन प्रतिसाद’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याकरिता 9684708316 आणि 8390929100 हे दोन हेल्पलाइन क्रमांक २४ तास सुरू राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी जाऊन मदत करणार आहेत. या दोन्ही उपक्रमांच्या अंमलबजावणीवर पोलीस अधीक्षक कार्यालयातून देखरेख ठेवली जाणार असल्याचेही बगाटे यांनी सांगितले.
याबरोबरच सर्व नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधणे सोपे होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला मोबाइल देण्यात आले असून, त्यांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे पोलीस विभागाच्या १७ सेवा ऑनलाइन दिल्या जातात. त्याबद्दल जागरूकता कमी असल्याने ऑनलाइन अर्जांचे प्रमाण कमी आहे; मात्र नागरिकांनी याबद्दल माहिती घेऊन घरबसल्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी या वेळी केले.
रत्नागिरी : गुन्ह्याच्या तपासाची प्रगती फिर्यादीला मिळणार व्हॉट्सअॅपवर
