लांजा : तालुक्यातील सालपे बौद्धवाडी येथे हनुमान मंदिराजवळील पाण्याच्या मोरीमध्ये ६० वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी मृतदेह आढळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत सिताराम जाधव (वय ६०, रा.सालपे बौद्धवाडी) यांना दारूचे व्यसन तसेच आकडी येण्याचा त्रास होता. २३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ते घराबाहेर पडले होते. मात्र दिवसभर घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केल्यावर रात्री साडेदहाच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील वहाळातील पाण्याच्या मोरीतील पाईपमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची फिर्याद त्याचा चुलत भाऊ शशिकांत यशवंत जाधव यांनी लांजा पोलिसांना दिली. दरम्यान, लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उर्मिला शेडे करत आहेत.