संगमेश्वर/दिनेश अंब्रे: येथील श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूजनांप्रती विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपली कृतज्ञता व्यक्त करत आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्याप्रदात्री सरस्वतीचे पूजन, ईशस्तवन आणि मनमोहक स्वागतगीताने झाली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या आदराने गुरूंचे औक्षण करून त्यांच्या चरणी फुले अर्पण केली. या भावनिक क्षणांमुळे संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले होते.
इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गुरूंविषयी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल आणि मिळालेले मार्गदर्शन त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच जीवनातील गुरूंच्या भूमिकेवर सखोल प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रविंद्र वासुदेव मुळ्ये होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “गुरूंचा ध्यास आणि त्यांची मेहनत विद्यार्थ्यांनी व्यर्थ जाऊ देऊ नये. त्या ध्यासाला आपण आपल्या कृतीतून आणि यशातून उत्तर द्यायला हवे.”
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुल मुलांचे वसतिगृह, कोळंबे येथील अधीक्षक जुवेकर सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “गुरू हा केवळ शिकवणारा नसतो, तर तो आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतो. विद्यार्थ्यांनी गुरूंप्रती आदर, निष्ठा आणि कृतज्ञता नेहमी जपली पाहिजे. गुरुपौर्णिमा हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, तो आपल्या अंतःकरणातून उमटणारा एक पवित्र भाव आहे.”
या सोहळ्याला संस्था सदस्य प्रथमेश मुळ्ये सर यांचीही विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले, तसेच त्यांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन केले. शेवटी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.