GRAMIN SEARCH BANNER

लांज्याच्या सुकन्या डॉ.सीमा कदम मेजर पदाने सन्मानित

Gramin Varta
20 Views

लांजा : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त) च्या उपप्राचार्या डॉ.सीमा शशिकांत कदम यांना रत्नागिरीतील नेव्हल युनिटचे कमांडर के.राजेशकुमार यांच्या हस्ते नुकतेच मेजर (एन.सी.सी.) पदाने सन्मानित करणात आले.

सीमा कदम यांचा जन्म लांजा येथील असून शहरातीत न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. लांजा धुंदरे येथील सामाजिक भान जपणारे प्रगतशील शेतकरी कै.अनंत कांबळे उर्फ दिवाणजी व उपक्रमशील आदर्श शिक्षिका, माजी मुखाध्यापिका कै.आक्काताई अनंत कांबळे यांच्या सीमा कदम तृतीय कन्या आहेत. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण महावीर कॉलेज, कोल्हापूर मधून पूर्ण केले असून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजी विक्रेत्या महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास “या विषयावर  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे त्यांनी डॉक्टरेट संपादन केली आहे.

तसेच सेट, नेट पदविका उत्तीर्ण केलेल्या सीमा कदम रत्नागिरी जिल्हयातील प्रख्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात गत २८ वर्षे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या गुणवत्ता पूर्ण कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना उपप्राचार्य पदाची जबाबदारी सोपविली आहे. यासोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.सी.सी. (नेव्हल)च्या त्या अधिकारीही आहेत.

भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून २००६ मध्ये महाराष्ट्र ६ – गर्ल्स बटालियन कोल्हापूर अंतर्गत २- महाराष्ट्र नेव्हल युनिट रत्नागिरी साठी पहिली लेडी एन.सी.सी ऑफिसर म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. एन.सी.सी विभागाच्या अनेक राष्ट्रीय उपक्रमांमध्ये त्यांना बहुमूल्य योगदान दिले असून अनेक शैक्षणिक तसेच अभ्यासेतर, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रामधील उपक्रमात त्या विविध जबाबदाऱ्या निभावत आहेत. राज्य,  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चा सत्र,  सेमिनार यामध्ये सहभाग घेवून सीमा कदम यांनी विविध विषयांवर ३० शोध निबंध सादर केले आहेत.

सीमा कदम मुंबई विद्यापीठांतर्गत वाणिज्य विषयातील पी.एच.डी. तज्ञ मार्गदर्शिका म्हणून काम करित असून मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या त्या सदस्या आहेत. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन अनेक स्थानिक आणि राष्ट्रीय संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. यामध्ये बिझनेस एक्स्प्रेस श्री फाऊंडेशन व आम्ही उद्योजिका, सांगली यांच्यातर्फे राज्यस्तरीय “संजिवनी पुरस्कार”, सेफरॉन तर्फे “नवदुर्गा पुरस्कार”, साहित्य अकादमी न्यू दिल्ली यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावरील “वीरांगणा सावित्रीबाई फुले पुरस्कार” डायरेक्टोरेट जनरल ऑफ एनसीसी नवी दिल्ली तर्फे एनसीसीमधील समर्पण, प्रामाणिक आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार, “डी जी एनसीसी पदक २०२०” आदी पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3210817
Share This Article