रत्नागिरी: गणपतीपुळे-निवळी मार्गावरील ओरी गावाजवळच्या एका अवघड वळणावर आज सकाळी तीन मोठे ट्रक अचानक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या तीन अवजड वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून, सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयगडहून निवळीच्या दिशेने जाणारे दोन ट्रक आणि एक गॅस टँकर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ओरी-घवालीवाडी येथील अरुंद आणि अवघड वळणावर थांबले. तांत्रिक बिघाडामुळे ही वाहने जागेवरच बंद पडली. एकाच वेळी तीन वाहने बंद पडल्याने या ठिकाणी मोठी कोंडी झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. बंद पडलेल्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिक घटनास्थळी दाखल झाले असून, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, ही अवजड वाहने असल्याने दुरुस्तीसाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक संथ गतीनेच सुरू राहणार आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी संयम राखून आणि काळजीपूर्वक प्रवास करावा, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.