चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (68) यांच्या हत्येप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. तपासात उघड झाले की, गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या बेरोजगार तरुणाने केवळ दागिने व पैशांसाठी हा खून केला.
जयेश गोंधळेकर हा मृत शिक्षिकेच्या ओळखीतील असून, पूर्वी सातारा येथे नोकरी करत होता. मात्र बेरोजगारी आणि पैशांची गरज यामुळे त्यानेच हा घातकी कट रचला. घराचा दरवाजा तोडण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने पोलिसांनी सुरुवातीपासूनच ओळखीच्या व्यक्तीवर संशय घेतला आणि तोच अखेर खरा ठरला.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास वेगवान केला. आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी कॉम्प्युटरची हार्डडिस्कही गायब केल्याचे निष्पन्न झाले.
मुळच्या दाभोळ (ता. दापोली) येथील महाकाळ कुटुंबातील वर्षा जोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निवृत्त होत्या. पतीच्या निधनानंतर त्या धामणवणे येथे एकट्याच राहत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती आणि लवकरच हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता. मैत्रिणीशी संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला व चौकशीदरम्यान हा खून उघड झाला.
ब्रेकिंग : निवृत्त शिक्षिकेच्या खुनाचा उलगडा ; दागिन्यांच्या हव्यासापोटी तरुणाने घेतला जीव!
