रत्नागिरी : येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आजअखेर जिल्ह्यातील 40 रुग्णांना 30 लाख 55 हजार रुपयांची मदत झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.
राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरविली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी, याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य वितरीत करणे, या दोन्ही प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहेत.
नागरिकांची सोय लक्षात घेऊन, अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामुळे अर्जदारांना मंत्रालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. जिल्हास्तरीय समिती ही स्थानिक पातळीवरच्या गरजा आणि अर्जदारांना तात्काळ मदत देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
प्रमुख कार्ये:
- जिल्ह्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठीचे अर्ज स्वीकारणे.
- अर्जांची प्राथमिक पडताळणी करणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणे.
- लहान किंवा कमी गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय घेऊन निधी मंजूर करणे.
- आवश्यकतेनुसार, अर्ज राज्यस्तरीय समितीकडे शिफारशीसाठी पाठवणे.
- रुग्णालयांशी समन्वय साधणे आणि उपचारांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.
- स्थानिक गरजू रुग्णांना निधी योजनेची माहिती देणे आणि अर्ज भरण्यास मदत करणे.
मदत कोणत्या आजारांवर मिळते
कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया (Cochlear implant) वय वर्षे २ ते ६, ह्दय प्रत्यारोपण (Heart Transplant), यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant), मुत्रपिंड प्रत्यारोपण (Kidny Transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (Lung Transplant ), अस्थीमज्जा प्रत्यारोपण (Bone Marrow Transplant ), हाताचे प्रत्यारोपण (Hand re reconstruction surgery ), खुब्याचे प्रत्यारोपण (Hip replacement), कर्करोग शस्त्रक्रिया (Cancer Sugery), कर्करोग औषधोपचार किरणोपचार (Cancer Chemotherapy and Radiotherapu), अस्थिबंधन (Surgery For ligament injury), नवजात शिशुचे संबधित आजार (Diseases of new born babies), गुडघ्याचे प्रत्यारोपण (knee replacement), रस्ते अपघात (Road Traffic accidents), लहान बालकांच्या संबधित शस्त्रक्रिया (Paediatric Surgeris), मेंदुचे आजार (Diseases of nervous system), हृदयरोग (Cardiac Diseases), डायलिसिस (Dyalysis), जळीत रुग्ण (Burn Injuries ), विद्युत अपघात/विद्युत जळीत रुग्ण (Electric Burn Injuries ).
000