कराड : पश्चिम घाटक्षेत्रात सर्वदूर जोरदार तर, कोयना पाणलोटात तुफान पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणाच्या सहा वक्री दरवाजातून काल सुरू असलेला ३३ हजार क्युसेकचा (प्रतिसेकंद घनफूट) जलविसर्ग आता ९० हजार क्युसेकच्या घरात पोहचल्याने कृष्णा- कोयना नद्यांना पूर आला आहे.
अशातच बहुतेक धरणांमधून सुरू असलेला विसर्गही वाढल्याने नद्यांची पूरस्थिती महापुराकडे वाटचाल करीत आहे. त्यात नद्यांकाठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले असून, अनेक पूल, रस्ते पाण्याखाली गेलेत. तर, नद्यांकाठची वस्ती सुरक्षित ठिकाणी हलवण्याची लगबग दिसत आहे. दरम्यान, पूरबाधित क्षेत्रात दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
कोयना धरणाच्या पाणलोटात आज मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या केवळ नऊ तासांत १४२.६६ मिमी. (५.६२ इंच) असा तुफान पाऊस झाला आहे. सध्या कोयनेचा धरणसाठा १००.३९ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ९५.३८ टक्के झाला असताना, धरणात ९१,२७१ क्युसेकची मोठी जलआवक सुरू आहे. धरण काठोकाठ भरत असल्याने आवक पाण्याइतका जलविसर्ग अपरिहार्य बनला आहे. त्यामुळे कोयनेचे सहा वक्री दरवाजे १२ फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात ८७ हजार क्युसेक तर, पायथा वीजगृहातून २,१०० असा ८९,१०० क्युसेकचा प्रचंड जलविसर्ग सुरू आहे. तर, दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील अन्य धरणांमधूनही विसर्ग वाढला आहे. त्यात धोम धरणातून १४,५१० क्युसेक, ‘कण्हेर’मधून १२,००० क्युसेक, ‘उरमोडी’तून ५,७०५ क्युसेक, ‘तारळी’तून २,८०४ क्युसेक असा मोठा जलविसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा- कोयनेसह त्यांच्या उपनद्यांनाही पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावाधाव दिसते आहे.
काल सोमवारी रात्री कोयना पाणलोटात तुफानी पाऊस झाल्यानंतर आज मंगळवारी सकाळी ११ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आठ फुटांवरून नऊ फुटांपर्यंत उघडण्यात आले. यानंतर ते तीन वाजता ११ फुटांनी तर, सायंकाळी सहा वाजता १२ फुटांनी उघडून ८७ हजार क्युसेकचा जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर, पायथा विद्युत गृहातून २,१०० क्युसेक असा एकूण ८९ हजार १०० क्युसेकचा एकूण विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. कोयनेच्या दरवाजातील मोठ्या जलविसर्गामुळे पाटण तालुक्यातील नवजा ते कोयनानगर दरम्यान पाबळ नाला येथे रस्ता खचल्याने तेथील वाहतूक बंद झाली आहे. कोयना भागातील गोवारे येथील पूल पाण्याखाली गेल्याने कोयना भागातील दुर्गम गावे संपर्काबाहेर आहेत. कोयना नदीवरील मूळगाव पूल पाण्याखाली गेल्याने मुळगाव, त्रिपुर्डी, कवरवाडी, चोपडी या गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. मोरणा- भागाला जोडणाऱ्या नेरळे पुलही पाण्याखाली गेल्याने येथून वाहतूक बंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यासह पूरबाधित भागातील शाळांना सुट्टी दिल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
कोयनेत हंगामात १२० टीएमसीची आवक
कोयना शिवसागरात आजवर पाण्याची विक्रम आवक झाली आहे. एकंदर १०५.२५ टीएमसी (अब्ज घनफूट) क्षमतेच्या कोयना धरणात आजवर जवळपास १२० टीएमसी म्हणजेच एकूण धरण क्षमतेच्या तब्बल ११४ टक्यांहून पाण्याची आवक झाली आहे.
कोयनेतून तब्बल ८९,१०० क्युसेकचा विसर्ग; कृष्णा-कोयनेला पूर; नद्यांचे काठ, पूल, रस्ते पाण्याखाली
