GRAMIN SEARCH BANNER

खेड: मुरडे येथील विहिरीत पंप काढताना चाकाळेतील तरुणाचा बुडून मृत्यू

खेड : तालुक्यातील मुरडे येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत, बिघडलेला नळपाणी योजनेचा पंप काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या विशाल सुधाकर चव्हाण (वय ४२, रा. चाकाळे-जगदीशनगर, खेड) या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने चव्हाण कुटुंबावर अकल्पनीय दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नळपाणी योजनेचा पाण्याचा पंप बिघडल्याने एका ठेकेदाराने विशालला तो विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार, विशालने कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. मात्र, विहिरीतील पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज त्याला आला नाही आणि त्यातच त्याचा बुडून करुण अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच विसर्जन कट्टाचे अध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य साहिल बुटाला, निखिल चौधरी, सागर आंजर्लेकर, मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचारी सूरज शिगवण आणि जयेश पवार हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनाही माहिती मिळताच त्यांनी मोठी गर्दी केली. उपस्थित सर्व मदतकर्त्यांनी विहिरीत उतरून सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर विशालचा मृतदेह बाहेर काढला.

मयत विशाल चव्हाण हा रोजंदारीवर मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. शहरातील एका भाजी व्यावसायिकाकडेही तो कामाला होता. कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने चव्हाण कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Total Visitor Counter

2475388
Share This Article