GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकी स्वारावर हल्ला

Gramin Varta
483 Views

राजापूर : राजापूर तालुक्याच्या विविध भागामध्ये बिबट्याच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मुक्त संचाराने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशातच पेंडखळे येथील चिपटेवाडी चे चिपटेवाडी फाटा परिसरात दुचाकीवर तीन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

यामध्ये दुचाकीवरून पडून दुचाकीस्वार अनिल चिपटे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे आता ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. हल्ला करणार्‍या बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पेंडखळे पंचक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

चिपटेवाडीतील येथील सुनिल माळी आणि संकेत किनरे जुवळे बस थांबा पासून भू गावच्या दिशेने दोघे एकत्र दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यात बिबट्याची पिल्ले आली. पण ती पिल्ले दोघांना भाटवाघाची आहेत असे वाटली. ती पिल्ले बाजूच्या झाडीत लगेच निघूनही गेली. परंतु, या तरुणांनी गाडी न थांबवता ते पुढे गेले. मात्र त्यांना लगेच मागून बिबट्यांच्या डरकाळीचा जोरात आवाज आला आणि त्यांनी गाडीचा वेग वाढवत गाडी पुढे ५०-७० मीटर नेली. पुढे पेंडखळे शाळा क्रमांक १ जवळ असलेल्या गतीरोधकाच्या ठिकाणी गाडीचा वेग थोडा कमी केला असता पाठीमागून पाठलाग करणा-या बिबट्यांनी डरकाळी फोडत पुढे सुमारे २००-३०० मीटर चिपटे वाडी फाटा (चव्हाण यांचे घर) इथपर्यंत या दुचाकीचा पाठलाग केला.

सुनिल माळी व सहकार्‍यांने आपला जीव वाचवत पुढे सुतार माळावरील गुरव यांचे दुकान गाठले आणि कोणी दुचाकीवरून चिपटे वाडी किंवा जुवळे वाडीत जात असेल तर त्यांना थांबवा पुढे ३ मोठे बिबटे आणि ३ पिल्लं आहेत असे सांगितले. तसा त्यांनी पेंडखळे गावातील व्हाट्सअप ग्रुपवर माहिती पाठवली. मात्र, त्यानंतर काही वेळात याच गावातील अनिल चिपटे हे चिपटे वाडी ते चिपटे वाडी फाटा (चव्हाण घर) या दिशेने कामानिमित्त निघाले होते. मात्र, पुढे रस्त्यालगत ३ मोठे बिबटे आणि ३ पिल्लं असल्याची त्यांना कोणतीच कल्पना नव्हती. अचानक अनिल चिपटे यांच्या दुचाकी वाहनावर या तीन मोठ्या बिबट्यांनी अचानक उडी मारली आणि अनिल चिपटे गाडीवरून खाली पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सौंदळ-आडवली येथून सोल्ये येथील रेल्वेस्टेशनकडे प्रवासी घेवून जाणार्‍या एका रिक्षा गाडीवरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना चार-पाच दिवसांपूर्वी घडल्याचे बोलले जात आहे. यामध्ये रिक्षाचे नुकसान होताना रिक्षा व्यवसायिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. तर, वाटूळ येथेही वाहनचालकांना प्रवासाच्यावेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले जाते.

” पेंडखळे येथे दुचाकीवर बिबट्याने केलेला हल्ला आणि त्यामध्ये दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटनेच्या अनुषंगाने पेंडखळे गावात प्रत्यक्ष भेट देत वनविभागातर्फे पाहणी करण्यात आली आहे. जखमी अनिल चिपटे यांची विचारपूस करीत त्यांना सहकार्य करण्याचे आश्‍वासित करण्यात आले आहे. बिबट्यांनी पाठलाग केल्याने घाबरलेले अनिल चिपटे हे पडून जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांशी चर्चा करून जनजागृतीसह बिबट्यांना जेरबंद करण्याच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. ” – जयराम बावदाने, वनपाल राजापूर

Total Visitor Counter

2645590
Share This Article