रत्नागिरी: खेड तालुक्यातून धार्मिक स्थळी चोरी झाल्याची एक गंभीर घटना समोर आली आहे. शिरगाव खुर्द येथील काळकाई देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी हात साफ करत सुमारे २०,०००/- रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही चोरी दि. ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांच्या मुदतीत घडली. शिरगाव खुर्द येथील शिवाजीनगर परिसरात असलेले हे मंदिर नेहमी उघडे असते, याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केली.
या घटनेनंतर, फिर्यादी प्रभाकर राजाराम भोसले (वय ५२, रा. शिरगाव खुर्द, खेड) यांनी खेड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, मंदिरातून लबाडीच्या इराद्याने चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये पितळ धातूच्या एकूण तीन घंटा (ज्यांची किंमत ९,०००/- रुपये आहे), पितळ धातूचे दोन नामणदिवे अर्थात समया (ज्यांची किंमत ६,०००/- रुपये आहे) आणि विशेष म्हणजे सिक्युओ रायज्ञार कंपनीचा एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (किंमत ५,०००/- रुपये) यांचा समावेश आहे. चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेल्यामुळे त्यांना ओळखणे पोलिसांसाठी अधिक आव्हानात्मक बनले आहे. चोरीस गेलेल्या या सर्व जुन्या वापरत्या मालाची एकूण किंमत २०,०००/- रुपये आहे.
खेड पोलिसांनी याप्रकरणी गु.आर.क्र. ३०५/२०२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम ३०५(अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात असल्याने खेड परिसरातील भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.