GRAMIN SEARCH BANNER

विंचू दंशावर चिपळूण, घोणसरेत मोफत प्रतिविष सिरम

Gramin Varta
494 Views

डॉ. विवेक नातू आणि टीमचे संशोधन;घोड्याचे रक्त वापरून तयार सिरम

चिपळूण : घोड्याचे रक्त वापरून तयार करण्यात आलेले विंचूदंश प्रतिविष सिरम (प्रिमिस्कॉर्प अँटी व्हेनम) आता चिपळूण आणि घोणसरे येथे मोफत उपलब्ध झाले आहे. नारायणगाव (पुणे) येथील प्रीमियम सिरम्स अँड व्हॅक्सिनस कंपनीने अतिशय अत्याधुनिक प्रयोगशाळेत हे सिरम विकसित केले आहे. हे प्रतिविष चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू लहान मुलांचे हॉस्पिटल आणि घोणसरे (उमरोली) येथील विजयश्री हॉस्पिटल येथे १० ऑक्टोबर २०२५ पासून संपूर्ण १ वर्ष मोफत उपलब्ध होणार आहे.या कालावधीत विंचू दंशावर नाममात्र खर्चात उपचारही उपलब्ध असतील, अशी माहिती देत नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विवेक नातू यांनी केले आहे.

१६ वर्षांच्या संशोधनाचे फलित

डॉ. विवेक नातू, डॉ. विकास नातू, डॉ. संतोष कामेरकर आणि त्यांच्या टीमने १६ वर्षांपूर्वी विंचू दंशावरील प्रतिविषावर संशोधन केले होते. त्यांच्या या संशोधनामुळे विंचू दंशामुळे होणारे मृत्यू आणि शरीराच्या हानीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
या संशोधनाविषयी सांगताना डॉ. नातू म्हणाले, “२०१० मध्ये आम्ही या प्रतिविषावर सखोल संशोधन केले. हे सिरम विंचवाच्या विषावर थेट प्रतिहल्ला करते व त्याला निष्क्रिय बनवते. त्यामुळे ॲड्रीनलिनचा स्त्राव थांबतो आणि रुग्णाला एका तासात सुधारणा जाणवते. २ ते ४ तासांत रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.”

त्यांनी पुढे सांगितले की, “विषाचे प्रमाण व रुग्णाचे वय, ऋतू आणि विंचवाचा प्रकार या सर्व घटकांवर उपचाराचे प्रमाण बदलते. म्हणून रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत प्रतिविषाचा डोस हळूहळू वाढवणे आवश्यक असते.”

घोड्याचे रक्त वापरून तयार सिरम

हे प्रतिविष घोड्याच्या रक्तातून तयार केल्यामुळे काही डॉक्टरांना रिॲक्शन येईल का, अशी शंका होती. मात्र डॉ. नातू यांनी सांगितले की, “विंचूदंशाच्या बाबतीत अशी भीती निराधार आहे. विंचू चावल्यानंतर शरीरात आधीच ॲड्रीनलिन मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याने प्रतिविषावर रिॲक्शन येण्याची शक्यता नसते. आमच्या संशोधनात १०० पेक्षा अधिक रुग्णांपैकी एकालाही रिॲक्शन आली नाही.”तसेच, योग्य प्रमाणात व शिरेतून दिल्यास रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होते, असे त्यांनी नमूद केले.

प्राझोसिनपेक्षा अधिक परिणामकारक

विंचू दंशावर विंचू प्रतिविष जल हे प्राझोसिन या औषधापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे २००६–०७ या काळात झालेल्या तौलनिक अभ्यासातून स्पष्ट झाले.हा शोधनिबंध जर्नल ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिसिनमध्ये ऑक्टोबर २०१० मध्ये प्रकाशित झाला होता.
डॉ. नातू म्हणाले, “भारतीय शास्त्रज्ञांनी हे प्रतिविष तयार केले ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे विंचू दंशामुळे होणारे मृत्यू आणि हानीचे प्रमाण खूप कमी झाले आहे.”

स्व. डॉ. तात्यासाहेब नातू यांचे स्वप्न साकार

डॉ. विवेक नातू यांनी सांगितले की, “कै. डॉ. तात्यासाहेब (श्रीधर) नातू यांनी १९८० ते १९९२ दरम्यान विधानसभेत विंचू दंशासाठी प्रतिविष विकसित करण्याची संकल्पना मांडली होती. या कार्यात डॉ. शिरोडकर आणि डॉ. काणकोणकर यांनी मोलाची भूमिका निभावली. माजी आमदार डॉ. विनय नातू, तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर आणि केंद्रीय आरोग्यमंत्री बॅं. ए.आर. अंतुले यांनी एफडीएची परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.”
आज त्यांच्या त्या संकल्पनेचे प्रत्यक्ष फलित म्हणजे हे “प्रिमिस्कॉर्प अँटी व्हेनम” आहे.

Total Visitor Counter

2648195
Share This Article