दोडामार्ग : सिंधुदुर्गातील झोळंबे (ता. दोडामार्ग) येथील जैवविविधतेने समृद्ध परिसर पुन्हा एकदा एका दुर्मीळ आणि तितक्याच सुंदर जीवाच्या दर्शनाने उजळून निघाला आहे.
पश्चिम घाटाचे वैभव म्हणून ओळखला जाणारा, पानांवरून हवेत तरंगत जाणारा ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ म्हणजेच ‘उडणारा बेडूक’ येथे आढळून आला आहे. या अनोख्या बेडकाच्या दर्शनाने निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
शुक्रवारी रात्री झोळंबे गावातील बागायत परिसरात वन्यजीव अभ्यासक ओंकार गावडे, विकास कुलकर्णी आणि सुजय गावडे यांना हा मनमोहक बेडूक दिसला. गेल्या आठवड्यात याच परिसरात ‘बॉम्बे सिसिलियन’ (देव गांडूळ) या दुर्मीळ जीवाचे अस्तित्व आढळले होते. त्यानंतर आता ‘उडणार्या बेडका’च्या नोंदीमुळे दोडामार्ग तालुक्याची जैवविविधता किती संपन्न आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा बेडूक त्याच्या अनोख्या जीवनशैलीमुळे आणि आकर्षक रूपामुळे नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो.
वन्यजीव अभ्यासक विकास कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बेडकाचे जीवनचक्र अत्यंत रंजक आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर हे बेडूक जागे होतात आणि प्रजननाची प्रक्रिया सुरू होते. नर बेडूक मोठा आवाज काढून मादीला आकर्षित करतात. पाण्याच्या डबक्यावर किंवा ओहोळावर झुकलेल्या झाडाच्या फांदीला हे बेडूक घरट्यासाठी पसंती देतात. मादी पानांवर एक चिकट स्राव सोडून आणि पाय घासून फेसाळ घरटे तयार करते व त्यात अंडी घालते.
काही दिवसांनी या अंड्यातून तयार झालेले ‘टॅडपोल्स’ (बेडकाची पिल्ले) थेट खाली पाण्यात पडतात. पाण्यात त्यांची पूर्ण वाढ होते आणि त्यानंतर ते पुन्हा झाडांवर आपले जीवन सुरू करतात. या दुर्मिळ बेडकाच्या अस्तित्वाने झोळंबे परिसराचे पर्यावरणदृष्ट्या असलेले महत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सिंधुदुर्ग: झोळंबे येथे आढळला दुर्मीळ ‘उडणारा बेडूक’
