GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड: पणदेरीत कुटुंबाला दांडक्याने मारले; आरोपीविरोधात गुन्हा नोंद

मंडणगड: तालुक्यातील पणदेरी येथे क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत बाप-लेकाला दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पणदेरी येथील नदीम अब्दुल शकूर याच्या विरोधात सोमवारी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत महंमद हनिफ अलिमियाँ तहविलदार (रा. पणदेरी, मस्जिद मोहल्ला) आणि त्यांचा मुलगा मुस्तफा तहविलदार हे दोघे जखमी झाले आहेत.

याबाबतची फिर्याद महंमद तहविलदार यांनी मंडणगड पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी नदीम अब्दुल शकूर याने क्षुल्लक कारणावरून तहविलदार यांच्या घरात घुसून महंमद तहविलदार आणि त्यांचा मुलगा मुस्तफा यांना दांडक्याने मारहाण केली. एवढेच नाही तर, तहविलदार यांच्या पत्नी नुरजहाँ यांनाही आरोपीने लाथेने मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या मारहाणीत फिर्यादी महंमद तहविलदार आणि त्यांचा मुलगा मुस्तफा जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी नदीम शकूरविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2475011
Share This Article