GRAMIN SEARCH BANNER

दुर्मीळ ‘ब्लॅक पँथर’ संगमेश्वरमध्ये बेशुद्ध आढळला, उपचारासाठी साताऱ्याला रवाना

देवरूख: निसर्गातील एक अत्यंत दुर्मीळ आणि देखणा प्राणी म्हणून ओळखला जाणारा ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव-देवरूख रस्त्यावर आज सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या जलद कार्यवाहीमुळे या बिबट्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, पुढील उपचारांसाठी त्याला साताऱ्यातील विशेष केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना आज सकाळी ७:३० च्या सुमारास घडली. रस्त्यावर एक बिबट्या निपचित पडलेला दिसल्याने ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता, हा प्राणी एक वर्षाचा नर ब्लॅक पँथर असल्याचे निष्पन्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज शेट्ये यांनी केलेल्या तपासणीत तो उपासमारीमुळे अत्यंत अशक्त झाल्याने बेशुद्ध पडला होता, असे समोर आले.

त्याच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत, कोल्हापूरचे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर आणि साताऱ्याचे डॉ. निखिल बनगर यांच्यासह तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असली तरी त्याला पुढील काही दिवस देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे.

रत्नागिरी आणि देवरूख येथे अशा दुर्मीळ प्राण्यांवर उपचारासाठी विशेष सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच, सध्याच्या हवामानातील बदलांमुळे त्याच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मुख्य वनसंरक्षक गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला पुढील उपचारांसाठी साताऱ्यातील टीटीसी (टायगर ट्रान्झिट सेंटर) या विशेष केंद्रात पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कार्यवाही यशस्वीपणे पार पाडण्यात आली. वनविभागाने या दुर्मीळ प्राण्याच्या जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे वन्यजीवप्रेमींकडून मोठे कौतुक होत आहे.

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास स्वतः त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू नये. अशा परिस्थितीत तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधावा.

Total Visitor Counter

2475146
Share This Article