GRAMIN SEARCH BANNER

ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

Gramin Search
2 Views

मुंबई- राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहे. ना कुठला झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा असं म्हणत दोन्ही बंधूंनी मोर्चाची घोषणा केली आहे.

येत्या ५ जुलैला हा मोर्चा मुंबईत निघेल. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांसोबतच साहित्यिक, कलाकारांनाही सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका घेत या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे. कुठली भाषा शिकायची हा इच्छेचा प्रयत्न आहे. सक्तीचा नाही. भाजपाचे हे सक्तीचे धोरण आहे. मुलांनी काय शिकायचे याचे स्वातंत्र्य द्या. प्रत्येक गोष्टी सक्ती केली जाते. महाराष्ट्रात सरकारी कामकाज, नोकरी सर्व व्यवहार मराठीतून चालतात ती यायला हवी म्हणून अनिवार्य केली जाते. मला फ्रेंच शिकायचे असेल ते शिकेन, जर्मन शिकेन पण तुम्ही सक्ती का करता? आधीच दफ्तराच्या ओझाने मुलं वाकतायेत. त्यात सक्तीचे विषय लादून त्यांची पुस्तके, वह्या वाढवणार म्हणजे मुलांच्या मेंदूवरचे दडपण वाढणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपा २४ तास फक्त राजकारण करत आहे असा आरोप त्यांनी केला.

तसेच भाजपाला कुठलेही सामाजिक भान नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री काय बोलत नाही. बैठकीबाहेर सक्ती नको बोलतात, मग बैठकीत मूग गिळून गप्प बसता का? तुमच्या समोर विषय येतात. त्यात चर्चा होते, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर होतो. त्यानंतर वाद झाल्यानंतर तुम्हाला १०-१५ दिवसांनी जाग येते. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहा. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे सांगा. मराठी माणसांना वेडे समजता का…आम्हीही मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होणार आहोत. राज-उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आम्हीही मोर्चात सहभागी होणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

दरम्यान, फक्त मुंबई तोडण्याचा डाव नाही तर महाराष्ट्रात सतत संघर्ष कसा पेटेल, लोक एकमेकांशी कसे भांडतील हे पाहिले जात आहे. मंत्रिमंडळातील सहकारी एकमेकांवर दुर्बिण घेऊन बसलेत, लोकांना द्यायला सरकारकडे पैसे नाही. कोण कुठली पूजा करते हे बाहेरून व्हिडिओ पोहचवले जातात. मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारी संघटना असं शिवसेनेचे ब्रीदवाक्य होते, आता सरकारमध्ये बसलेत त्यापलीकडे काही बोलायचे नाही. फक्त गोंधळ घालून दिवस पुढे ढकलण्याचे काम सरकार करतंय, लोकहितासाठी काम करत नाही असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केला.

Total Visitor Counter

2648188
Share This Article