GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: परदेशात नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक

Gramin Varta
250 Views

रत्नागिरी: परदेशात चांगल्या पगाराची नोकरी लावण्याच्या भूलथापांना बळी पडून रत्नागिरी शहरातील एका कुटुंबाची तब्बल २१ लाख २ हजार २५६ रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एका अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किर्तीनगर येथील रहिवासी असलेल्या आयेशाबी इम्रान टेमकर (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही फसवणूक ०४ सप्टेंबर २०२४ ते ०६ जानेवारी २०२५ या कालावधीत घडली आहे.

तक्रारीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी आयेशाबी यांच्या भावाला तसेच त्यांच्या नात्यातील आणि ओळखीतील इतर लोकांना परदेशात आकर्षक नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. नोकरीच्या नावाखाली आरोपी महिलेने स्वतः, तिची भाची आणि बहिण यांच्या मार्फतीने फिर्यादींकडून रोख स्वरूपात आणि ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात पैसे स्वीकारले. एवढेच नव्हे तर, आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादींना दोनदा मंगळूर आणि एकदा केरळ येथे एकूण २० लोकांना घेऊन जाण्यासाठी लागलेला खर्च करावा लागला. तसेच फिर्यादीचे पती यांनाही याच कामासाठी केरळला जाण्याचा खर्च करावा लागला. या सर्व प्रक्रियेत आरोपीने विश्वास संपादन करून फिर्यादी आयेशाबी आणि त्यांच्या पतीची एकूण ₹२१,०२,२५६/- एवढी मोठी रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आयेशाबी टेमकर यांनी दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.४३ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) नुसार गुन्हा क्र. ३८९/२०२५ दाखल केला आहे. परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक झाल्याने रत्नागिरी शहरात खळबळ उडाली असून, पोलीस अज्ञात आरोपी महिलेचा कसून शोध घेत आहेत आणि नागरिकांनी अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन करत आहेत.

Total Visitor Counter

2648022
Share This Article