रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गोळप कुंभारवाडी सडा येथे घरातील बेडरुममध्ये बेडवर काढून ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश शंकर साळवी (वय ६०, व्यवसाय व्यापार, रा. गोळप कुंभारवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली आहे. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून १० एप्रिल २०२६ रोजी रात्री नऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरीची घटना घडली असून, २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घरामध्ये घरकाम करण्यासाठी येणारी महिला सविता नरेंद्र गावडे (रा. कुंभारवाडी सडा, ता. जि. रत्नागिरी) हिच्यावर या चोरीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमूद कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या बेडरुममधील बेडवर काढून ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या फिर्यादी यांच्या संमतीशिवाय, स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने किंवा संशयिताने चोरून नेल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी ४० हजार रुपये मूल्य असणारी आणि प्रत्येकी १० ग्रॅम वजनाची, एक नवग्रहाची सोन्याच्या धातूची अंगठी आणि दुसरी त्यावर आडव्या रेषा असलेली चौकोनी डिझाईनची सोन्याच्या धातूची अंगठी, अशा एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे. घरकामासाठी येणारी महिला सविता नरेंद्र गावडे हिच्यावर फिर्यादी यांनी संशय घेतला आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी उशीरा खबर देण्याबाबत असे स्पष्ट केले आहे की, घरी घरकामाला असणारी संशयित महिला हिला ते मुलगी मानत असल्याने, ती स्वतःहून सोन्याच्या अंगठ्या परत आणून देईल अशी त्यांना आशा होती, त्यामुळे फिर्यादीने सुरुवातीला उशीर केला होता. मात्र, खात्री पटल्यानंतर अखेर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (क) प्रमाणे तसेच संबंधित कलमांनुसार पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.






