रत्नागिरी : महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते आणि कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी येथील विश्वेश्वरय्या हॉल येथे कोकण परिक्षेत्रातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय ‘कॅपेसिटी बिल्डींग अँड बिहेविअरल लीडरशिप इनिशिएटिव्ह ट्रेनिंग’ यशस्वीरित्या संपन्न झाले. पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्व क्षमतेचा विकास करणे, प्रशासकीय कौशल्य अधिक प्रभावी बनविणे, नागरिकाभिमुख पोलीसिंगला चालना देणे आणि आधुनिक पोलीस व्यवस्थापनाच्या संकल्पनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.
दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये नेतृत्व कौशल्य, प्रशासकीय क्षमता, प्रभावी संवादकौशल्य, वर्तन कौशल्य तसेच नागरिकांशी संवेदनशील, सकारात्मक आणि विश्वासार्ह संवाद प्रस्थापित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात मान्यवर पोलीस उपअधीक्षक श्री. भानुदास खटावकर, श्रीमती मौसमी निलाखे तसेच श्रीमती ईशानी कांचन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करताना निर्णयक्षमता, प्रभावी नेतृत्व, बदलत्या काळातील पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका, संघभावना वृद्धिंगत करण्याच्या पद्धती, जबाबदारीची जाणीव आणि निर्णय प्रक्रियेतील परिणामकारकता याविषयी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून सहभागी अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणारी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, अशा प्रकारचे प्रशिक्षण पोलीस दलातील नेतृत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत सहभागी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.






