सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; जिल्ह्यात एकाच दिवशी २२ वाहनचालकांवर गुन्हे

Gramin Varta
85 Views

रत्नागिरी : सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईत तब्बल २२ वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेर्डी येथील बजाज शोरूमसमोर महामार्गावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विकास संजय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच परिसरातील खेर्डी बाजारपेठेसमोरील महामार्गावर गाडी उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रफिक दाऊद मोटलानी याच्यावरही कारवाई करण्यात आली. तसेच गुहागर-कराड मार्गावरील स्मार्ट बाजारसमोर वाहन बेदरकारपणे उभे करून निघून गेल्याप्रकरणी सौरभ संजय शिंदे, तर खेर्डी माळेवाडी येथील चामुंडा मार्बलसमोर सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून पसार झाल्याप्रकरणी विनोदकुमार रामेश्वर सिंग याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

सावर्डे पोलिसांनीही कारवाईचा धडाका कायम ठेवत सावर्डे बाजारपेठेत मुंबई-गोवा महामार्गावर आयशर मालवाहू टेम्पो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मुकुंद विजय जोशी याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच वहाळगाव बाजारपेठेतील सर्व्हिस रोडवर प्रवासी मारुती इको अस्ताव्यस्तपणे उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अजित रामचंद्र गमरे याच्यावरही कारवाई करण्यात आली.

संगमेश्वर येथे एस.टी. बसस्थानकासमोरील सार्वजनिक रस्त्यावर टाटा मॅजिक टेम्पो उभा करून नागरिक व वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुभाष गणपत पिंलणकर याच्यावर गुन्हा दाखल झाला. लांजा पोलिसांनी सापुचेतळे-दोन आंबा मार्गावर सहा चाकी टाटा ट्रक अस्ताव्यस्त उभा करणाऱ्या संतोष बाबू भोजे याच्यावर कारवाई केली. खेड पोलिसांनी भरणे नाका येथील मुंबई-गोवा महामार्गावर चारचाकी वाहन उभे करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भावेश भास्कर मंडलीक याच्यावर गुन्हा दाखल केला.

अलोरे-शिरगाव पोलिसांनी पेढांबे-कुंभारवाडी येथे हॉटेल निसर्गसमोरील मुख्य रस्त्यावर अवजड अशोक लेलँड वाहन उभे करणाऱ्या सुरेश शांतागौडा शाशनुर याच्यावर कारवाई केली. गुहागर पोलिसांनी शृंगारतळी पोलीस चौकीसमोरील गुहागर-चिपळूण मार्गावर दुचाकी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जहागिर मुंताज अली आलम याच्यावर गुन्हा नोंदविला.

रत्नागिरी शहरातही पोलिसांनी दोन वाहनचालकांवर कारवाई केली. सावरकर शिल्पासमोरील रस्त्यावर व्होक्सवॅगन ॲमिओ उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सचिन दिलीप पाडळकर, तर धनजी नाका ते सावरकर चौक मार्गावर महिंद्रा एक्सयूव्ही उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजीव कुमार विश्वेश्वर प्रसाद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दापोली पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगविरोधात सर्वाधिक कारवायांपैकी एक मोहीम राबविली. बसस्थानकासमोर बोलेरो पिकअप रस्त्यावर उभी करून निघून गेल्याप्रकरणी संजय सुनील शिगवण, केळस्कर नाका येथे अर्टिगा कार उभी करून पसार झाल्याप्रकरणी अश्वेश अशोक कांबळे, मच्छिमार्केटसमोर अर्टिगा कार रस्त्यात सोडून गेल्याप्रकरणी महेश वामन जाधव आणि त्याच परिसरात टाटा इंट्रा मालवाहू टेम्पो उभा करून निघून गेल्याप्रकरणी जुबेर फारुख कुडुपकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारवांचीवाडी फाटा ते खेडशी मार्गावर सलग तीन कारवाया केल्या. या मार्गावर दुचाकी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रघुनाथ उल्लेश खोत, चारचाकी वाहन उभे केल्याप्रकरणी दिनेश दिलीप शिंदे आणि दुचाकी अस्ताव्यस्तपणे लावून रहदारीस धोका निर्माण केल्याप्रकरणी नईम मुन्नावर पटेल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

राजापूर पोलिसांनीही सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी कारवाई केली. बंदरधक्का येथील सार्वजनिक शौचालयाजवळ गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुझुकी सुपर कॅरी वाहन उभे करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सादिक हम्मिद सागवेकर याच्यावर, तर महालक्ष्मी ज्वेलर्ससमोर प्रवासी रिक्षा रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विनायक दीपक चौगुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या या कारवाईमुळे सार्वजनिक रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. विशेषतः मुंबई-गोवा महामार्ग, बाजारपेठा, बसस्थानके आणि शहरातील वर्दळीचे रस्ते येथे चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्याने वाहतूक कोंडीसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांच्या या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.

Total Visitors :
4819442
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *