‘मिशन टेप फॉर सेफ’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात विशेष मोहीम; ट्रक-डम्परला रेडियम पट्ट्या, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

Gramin Varta
557 Views

रत्नागिरी : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ‘MISSION TAPE for SAFE – Accident Prevention’ अंतर्गत जिल्हाभर विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान ट्रक, डम्पर आणि अन्य अवजड वाहनांवर परावर्तित (रेडियम) पट्ट्या लावण्यात आल्या. तसेच नंबर प्लेट नसलेल्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत त्यांना लाल पट्टी (Red Marking) करण्यात आली. काही वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) माइनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलिस निरीक्षकांनी आपल्या पथकासह ही विशेष कारवाई केली.

रात्रीच्या वेळी अवजड वाहने सहजपणे दिसावीत आणि मागून येणाऱ्या वाहनांना त्यांचा अंदाज यावा, यासाठी रेडियम पट्ट्या लावण्यावर भर देण्यात आला. तसेच नंबर प्लेट नसलेली किंवा नियमांचे उल्लंघन करणारी वाहने रस्त्यावर धावू नयेत, यासाठीही पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला.

रस्ते सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Total Visitors :
4576141
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *