GRAMIN SEARCH BANNER

ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Gramin Varta
8 Views

मुंबई: यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून महिन्याच्या मध्यावर काहीसा खंड पडल्यानंतर जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला.

मात्र, जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावर आयएमडी च्या माहितीचा हवाला देत सांगितले की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र, ईशान्य भारत, पूर्व भारताचे काही भाग, मध्य भारताचे तुरळक भाग आणि दक्षिण भारताच्या नैऋत्य भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असू शकते.

आयएमडीच्या महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने आतापर्यंत देशातील जवळपास सर्व भाग व्यापले आहेत. हिमाचल प्रदेशात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीइतकाच पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची स्थिती वेगवेगळी आहे. विदर्भात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून, भंडारा, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, गडचिरोली, गोदिया आणि यवतमाळमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि पुणे विभागातही काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पावसामुळे धरणांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे.

मात्र, काही भागांमध्ये अजूनही मान्सूनची प्रतिक्षा आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी आज तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून, सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर अधिक वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पंढरपूर परिसरात उजनी आणि वीर धरण क्षेत्रात पावसामुळे वाढलेला साठा पाहता भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. उजनी धरणातून 71,000 क्यूसेक तर वीर धरणातून 31,000 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

येत्या काळात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सणवारांची तयारी करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, शेती, वाहतूक आणि सार्वजनिक जीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Total Visitor Counter

2650952
Share This Article