GRAMIN SEARCH BANNER

“गुणवंत विद्यार्थी यशस्वी होतील तेव्हाच वर्धापन दिन खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल” – विजय उर्फ बाबा सावंत

Gramin Varta
8 Views

तुषार पाचलकर, राजापूर

कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही, नोकरीच्या शोधात होणारे स्थलांतर हा चिंतेचा विषय आहे. पाचल परिसरात उच्च शिक्षणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या अनेक विभूतींना आजच्या पिढीचे अन्यत्र जाणे वेदनादायक वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमता ओळखून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करून उज्ज्वल यश मिळवावे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळेच वर्धापन दिन सार्थ ठरेल, असे मत संस्था सदस्य विजय उर्फ बाबा सावंत यांनी व्यक्त केले.

श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना सदैव प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर, सदस्य अशोक सक्रे, चंद्रकांत लिंगायत, सिद्धार्थ जाधव, माजी सरचिटणीस नारायण पांचाळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एस. मेश्राम यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविक मनोगतातून डॉ. विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. यावेळी महाविद्यालयाच्या ‘सह्यगिरी’ या वार्षिक अंकाचे व डॉ. बी.टी. दाभाडे लिखित ‘कोकणातील गौरी गणपती गीते’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

डॉ. दाभाडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सरचिटणीस नरेश पाचलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. पी.एस. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अविरत कार्यरत असून, विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करून स्वतःला सिद्ध करावे.”

संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर म्हणाले, “संस्थेच्या जडणघडणीत अनेक मान्यवरांचे अमूल्य योगदान असून, त्यांच्या स्मृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे. खापणे साहेबांचेही योगदान अविरत सुरू असून, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा.”

संस्था सदस्य अशोक सक्रे म्हणाले, “आज महाविद्यालय ३१ व्या वर्षात पदार्पण करत असले तरी प्रारंभीचा संघर्ष आजही आठवतो. तो डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे.”

माजी सरचिटणीस नारायण पांचाळ यांनी संस्थेच्या संघर्षमय वाटचालीचा उल्लेख करून सांगितले की, “ज्यांनी या संस्थेसाठी प्रारंभीपासून संघर्ष केला, त्यांचे स्मरण आज या दिवशी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी या परंपरेचे भान ठेवून पुढे वाटचाल करावी.”

राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या ‘मायबोली’ या लोकगीत भिंती पत्रिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.टी. दाभाडे यांनी केले तर आभार प्रा. पी.पी. राठोड यांनी मानले.

Total Visitor Counter

2648062
Share This Article