GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आमदार प्रविण दरेकर यांची सदिच्छा भेट

Gramin Varta
152 Views

रत्नागिरी: सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचे नेतृत्व, समुह पुनर्विकास प्राधिकरण, दि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष आणि विधान परिषद आमदार गटनेते  प्रविण दरेकर यांनी नुकतीच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाने त्यांचा यथोचित सत्कार केला, तसेच जिल्हा बँकेच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांच्या कामकाजातील प्रमुख अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. बँकेचे संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते श्री. दरेकर साहेब यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला, तर बँकेचे मा. अध्यक्ष कृषीभुषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी भ्रमणध्वनीवरून साहेबांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बँकेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या नेत्रदीपक आर्थिक प्रगतीचा उल्लेख केला. बँकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ₹५,०००/- कोटीचा व्यवसाय पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले, तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना ३०% एवढा उच्चांकी लाभांश दिला असल्याचे नमूद केले. यानंतर, बँकेचे संचालक अॅड. दिपकजी पटवर्धन यांनी जिल्हा बँकांना कामकाजात येणाऱ्या प्रमुख अडचणी मा. दरेकर साहेब यांच्यासमोर मांडल्या. नवीन शाखा उघडण्यास मान्यता मिळण्यामधील विलंब, कोकणातील ७/१२ उताऱ्यावर एकापेक्षा अधिक व्यक्तींची नावे असल्यामुळे कर्जव्यवहार करणेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि वसुलीकरिता मिळालेले अधिकार बोथट होणे अशा प्रमुख अडचणी सांगून, याबाबतचे निवेदन त्यांनी प्रविण दरेकर यांचेकडे सुपूर्द केले. या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून जिल्हा बँकेला दिलासा देण्याची विनंती त्यांनी केली.
प्रविण दरेकर यांनी आपल्या मनोगतात रत्नागिरी जिल्हा बँकेचे प्रथमतः आभार मानले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना १०६ वर्षांपूर्वी म. गांधीजी यांनी केली, आणि त्याचे अध्यक्ष पद भूषवण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, जिल्हा बँकांनी सतत नाविण्यपूर्ण प्रयोग करून आपली प्रगती साधावी. विशेषतः फलोत्पादन प्रक्रिया, मासेमारी व टुरिझम व्यवसाय संस्था उभ्या करण्यासाठी प्रयत्न करावेत.

कोकणातील सर्व जिल्हा बँका ‘अ’ वर्गात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून, अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी सर्व जिल्हा बँकांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी दूर करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील, अशी महत्त्वाची ग्वाही त्यांनी दिली. यात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकरिता ७/१२ उताऱ्यातील १० गुंठे अट शिथिलता, वैयक्तीक कर्जमर्यादेमध्ये वाढ, वसुली कामकाजाबाबतच्या अटी तसेच संस्थांच्या पोटनियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी बँकेचे सन्मा. संचालक अॅड. दीपक पटवर्धन, श्रीम. दिशा दाभोळकर, श्री. जयवंत जालगांवकर, श्री. अमजद बोरकर, श्री. गजानन पाटील, श्री. मधुकर टिळेकर, श्री. राजेंद्र सुर्वे, श्री. महेश खामकर, श्री. रामचंद्र गराटे तसेच मा. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Total Visitor Counter

2647815
Share This Article