GRAMIN SEARCH BANNER

आंगवलीच्या विकासासाठी अमित रेवाळेंचा पुढाकार!

Gramin Varta
180 Views

स्वखर्चाने सलग तिसऱ्या वर्षी केली रस्त्याची साफसफाई; ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

देवरुख/शांताराम गुडेकर: खेड्यापाड्यांतील वाड्यावस्त्यांच्या विकासाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना, चिपळूण तालुक्यातील आंगवली येथे एक नवा राजकीय-सामाजिक उदय होताना दिसत आहे. कोणत्याही प्रशासकीय पदावर नसतानाही, येथील भूमिपुत्र श्री. अमित रेवाळे हे स्वखर्चाने गावात आणि पंचक्रोशीत लोकोपयोगी उपक्रम राबवून विकासाचा वसा जपत आहेत. याच तळमळीतून त्यांनी सलग तिसऱ्या वर्षी आंगवली येथील रेवाळेवाडी मुख्य रस्ता ते गावकर वाडीपर्यंतच्या रस्त्याची साफसफाई स्वखर्चाने केली आहे.

कोकणातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर आणि पायवाटांवर पावसाळ्यात दाट झाडी वाढत असल्याने प्रवासादरम्यान अनेक अडचणी येतात. वाढलेल्या झाडीमुळे रस्ते अरुंद होतात, अपघाताची भीती वाढते, तसेच जंगली जनावरांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे गावांतील वाड्यांमधील मुख्य रस्ते आणि पायवाटा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
आंगवली गावकर वाडी वस्ती अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेली आहे. मात्र, अमित रेवाळे यांनी स्वतःच्या खिशाला भार देऊन, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा महत्त्वाचा प्रश्न हाती घेतला. त्यांनी रेवाळेवाडी मुख्य रस्ता ते गावकर वाडीपर्यंतच्या रस्त्याची साफसफाई करून प्रवासाची समस्या दूर केली आहे.
अमित रेवाळे यांच्या प्रशासकीय पदावर नसतानाही केलेल्या या लोकोपयोगी कामांमुळे गावकरी भारावून गेले आहेत. त्यांच्या या समाजकार्याची नोंद घेत गावातील थोरामोठ्यांकडून आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर कौतुकास्पद शब्दांचा वर्षाव होत आहे. रेवाळे यांच्या निस्वार्थी कार्याची दाद गावातील नागरिक येणाऱ्या काळात नक्कीच घेतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. अमित रेवाळे यांनी दाखवलेला हा पुढाकार इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.

Total Visitor Counter

3376361
Share This Article