GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी येथील शतक महोत्सवी नाट्यसंमेलन पुढे ढकलले

मुंबई : शतक महोत्सवी नाट्यसंमेलनासाठी दीड वर्षांनी का होईना येत्या २४ एप्रिलचा मुहूर्त मिळाला होता. मात्र, पुन्हा एकदा रत्नागिरी येथे होणारे हे नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.

शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाच्या नवीन तारखांविषयी लवकरच अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी सांगितले.

रत्नागिरी येथे २४ ते २६ एप्रिलदरम्यान शतक महोत्सवी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार होते. मात्र, हे नियोजित नाट्य संमेलन आता पुढे ढकलण्यात आले आहे. संमेलन पुढे ढकलण्यामागचे कारण स्पष्ट करताना रत्नागिरी येथील परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी संमेलनासाठी अधिक वेळ मागून घेतल्याची माहिती अजित भुरे यांनी दिली. नाट्यसंमेलन सांगता समारंभ आयोजित करणाऱ्या शाखा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संमेलन भव्यदिव्य करण्याच्या दृष्टीने त्यांना अधिक वेळेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी येथील संमेलन पुढे ढकलण्याची त्यांची विनंती रास्त आहे, असे वाटल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच नियामक मंडळाची सभा घेऊन चर्चेअंती शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे भुरे यांनी स्पष्ट केले.

गेल्याच महिन्यात झालेल्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत १०१ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची निवड करण्यात आली. त्याआधी रखडलेल्या शतक महोत्सवी नाट्यसंमेलनाचा सांगता समारंभ रत्नागिरी येथे २४ ते २६ एप्रिलदरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १०१ वे नाट्यसंमेलन बोरिवली येथे होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, आता रत्नागिरी येथील नाट्यसंमेलन रखडले असल्याने त्याचा परिणाम बोरिवली येथील संमेलनावरही होणार आहे. येत्या नियामक मंडळाच्या बैठकीत रत्नागिरी येथील संमेलनाचे वेळापत्रक ठरवले जाईल,

त्यानंतर बोरिवली येथील नाट्यसंमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असेही भुरे यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3483456
Share This Article