रत्नागिरी : थिबा राजा कालीन बुद्ध विहारासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तात्काळ रद्द करून सदर जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी, या मागणीसाठी थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेऊन मागण्यांबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती मागितली. यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र या कालावधीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
संघर्ष समितीने २७ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले होते. थिबा राजा कालीन बुद्ध विहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तात्काळ थांबवावे तसेच ही संपूर्ण जागा बुद्ध विहारासाठी बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली होती.
निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात एल. व्ही. पवार, किशोर पवार, अमोल जाधव, सुनील आंबुलकर, दीपक जाधव, प्रकाश पवार, राजेंद्र कांबळे, दिवेन कांबळे, बी. के. पालकर, अजित जाधव, प्रदीप पवार, तुषार जाधव, मिलिंद सावंत, राजन जाधव, शिवराम कदम यांचा समावेश होता.
थिबा पॅलेस येथील कम्युनिटी सेंटरचे बांधकाम रद्द करा अन्यथा प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषणाचा इशारा






