सचिन यादव / धामणी
दिवाळीत भरभरून वाहत असतो तो आनंद, उत्साह आणि जल्लोष. आकाशकंदील, रांगोळी, पणत्यांनी घर न् घर आणि मनेही उजळून निघतात. दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सुरू होते. तर बहुतांश ठिकाणी लहान मुलांची किल्ला बनवायची तयारी असते. थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्णक्षण, अनेक मोहिमा, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे.
गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण, चिकट धान्याचे पीठ अशा गोष्टी एकत्र करून एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. गावात काही जण हे किल्ला बांधणी करतात. तर काही साहित्य आणण्याचे काम करतात. पुढे मग किल्ला बांधणी झाली की, गेरू चुना वापरून किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते. गुंजा, करडई अशा धान्यांनी नक्षीकाम केल्या जाते. मग किल्ल्यावर ध्वज लावले जातात. मूर्ती ठेवल्या जातात. झेंडूच्या झाडाचे तोरण लावले जाते. संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते. संगमेश्वर तालुक्यातील धामणी सोनारवाडी येथील निखिल देवरुखकर याने यंदा प्रतापगड किल्ला तयार करून सर्वांच लक्ष वेधून घेत आहे
गेले आठ दिवस तो मेहनत घेत होता.
किल्ले तयार करण्यासाठी प्राथमिक तयारी
किल्ला तयार करताना काही प्राथमिक तयारी करावी लागते. आजूबाजूला पडलेले दगड, लाल माती, प्लॅस्टिकच मावळे, सैनिक, प्राणी, सिंहासन, झाडे अशी सामग्री आधी जमवावी लागेल. त्यानंतर चांगली जागा निवडावी लागते. पारंपरिक किल्ला तीन प्रकारे बनवता येतो. १) भुईकोट किल्ला (जमीन सपाटीवरील), २) गिरिदुर्ग (डोंगरावर असलेला) आणि ३)जलदुर्ग (पाण्यात असलेला) यापैकी कुठल्या प्रकारचा किल्ला तयार करायचा हे आधीच निश्चित करावे लागते. शक्यतो भुईकोट किल्ला हा बच्चेकंपनीचा आवडता असतो. गडकिल्ले बनविताना तट, बुरूज, माची, दरवाजे, पायऱ्या, मार्ग, पाण्याची टाकी, मदिरे, दारूगोळ्याचे ठिकाण, डोंगराचे सुळके आणि शिरा आदींचा विचार होणे आवश्यक आहे. नुसता डोंगर उभारून किल्ला बनत नाही. किल्ला तयार करताना तो चहूबाजूंनी तटबंदी तयार करा. सैनिक, मावळे, तोफ, पाण्याचे टाके यांची योजना कल्पकतेने केली की एक चांगला किल्ला तयार होतो.
निखिल देवरुखकर
किल्लेदार
धामणी येथील निखिल देवरुखकर याने तयार केली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती
