GRAMIN SEARCH BANNER

दापोली : एकीला लग्नाचे आमिष, दुसरीसोबत साखरपुडा, फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

Gramin Varta
11 Views

दापोली :  लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, तरुणाने पीडितेला २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करून फसवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आसूदबाग येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी आणि मुरुड येथील रहिवासी असलेल्या आरोपीची ओळख २०२३ ते २०२५ या कालावधीत झाली होती. आरोपीने पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तिचा वारंवार पाठलाग केला आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडितेच्या आई-वडिलांचा विश्वास जिंकून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर, त्याने पीडितेसोबत फिरायला जाण्याच्या निमित्ताने तिच्या शरीरास वारंवार स्पर्श करून शरीरसंबंधांची मागणी केली.

पीडितेने आरोपीच्या या मागणीला नकार दिल्यावर, ‘मी तुझ्याशीच लग्न करणार आहे’, ‘मी तुझा होणारा नवरा आहे’ असे सांगून त्याने तिला शरीरसंबंधांसाठी वारंवार दबाव आणला. इतकेच नव्हे, तर ‘मला तुझे फोटो हवे आहेत’ असे सांगून त्याने पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली, असेही तक्रारीत नमूद आहे.
अखेरीस, २७ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपीने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा केल्याचे पीडितेला समजले. यामुळे आपली आणि आपल्या आई-वडिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने तात्काळ दापोली पोलिस ठाण्यात धाव घेतली. या फसवणुकीमुळे तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास झाल्याचे तिने तक्रारीत सांगितले आहे.

पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता (IPC) कलम ७५(२), ७८, ३५२(२), ११५(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2648011
Share This Article