रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १८ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत रत्नागिरी पोलीस दलाने पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या सूचनेनुसार आणि नूतन अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑल आऊट ऑपरेशन’ यशस्वीरित्या राबवले. या विशेष मोहिमेत जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक कारवाई करण्यात आली.
या ऑपरेशनमध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी, श्री. निलेश माईनकर; उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण, श्री. राजेंद्रकुमार राजमाने; परिमंडळ पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे; आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे हे स्वतः उपस्थित होते. एकूण १० पोलीस निरीक्षक, ३३ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक आणि २८ पोलीस अंमलदार यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या मोहिमेदरम्यान १६ फिक्स पॉईंट्स आणि ०५ पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आली होती. जिल्ह्यात एकूण ३१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ९१ मोटार वाहन केसेस नोंदवण्यात आल्या. १ केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला, जो चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. १ अंमली पदार्थ संदर्भात कारवाई करण्यात आली, जी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत होती. १४ पाहिजे/फरारी गुन्हेगारांपैकी १३ गुन्हेगार मिळून आले. २० हिस्ट्रीशिटर तपासले असता १७ मिळून आले. ०३ NBW (नॉन-बेलेबल वॉरंट), ०६ BW (बेलेबल वॉरंट) आणि १२ समन्स बजावण्यात आले. ८७२ वाहने आणि १७१६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. ६२ लॉज, ४६ हॉटेल्स आणि ११ धाबे तपासण्यात आले. १५ बँका, १७ एटीएम, ४४ मंदिरे/मशिदी आणि ०३ लँडिंग पॉईंट्सची तपासणी करण्यात आली.
या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीवर चांगलाच वचक बसला असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत झाली आहे. रत्नागिरी पोलिसांनी केलेल्या या प्रभावी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.