रायगड: सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये शनिवारी (ता. 26) रात्री एक ते रविवारी (ता. 27) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 जणांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले.
यावेळी घरातील सोने व रोकड लुटून पसार झाले. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.
गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावांमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एकामागून एक घरांना लक्ष्य केले. गोंदाव येथील एका घरात चोरी करून दरोडेखोरांनी हातोंड गाव गाठले. या टोळीने घरातील लोकांच्या गळ्यावर कोयता ठेवत आणि तलवारीचा धाक दाखवत लूटमार केली. या टोळीने कोयता व तलवार सदृश्य शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सोने, रोकड, बँक पासबुक आणि चेकबुक असा मौल्यवान ऐवज लंपास केला. या दरम्यान, गावकऱ्यांनी तत्काळ जांभूळपाडा पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दरोडेखोर पुढच्या गावात दरोडा टाकत होते, ज्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरले.
पोलिसांचा तपास सुरू पोलीस अधिकाऱ्यांनी दिली भेट
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजीत शिवतारे, पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर तसेच स्थानीय गुन्हे शाखेच्या टीम, दंगल नियंत्रक पथक यांनी भेट देऊन वेगाने तपास सुरू केला आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवतारे यांनी चोरी झालेल्या प्रत्येक घराचा पंचनामा केला असून गुन्ह्याच्या अनुषंगाने योग्य तो तपास सुरू असल्याचे म्हटले.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट
या सशस्त्र दरोड्यांनी गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. रात्रीच्या अंधारात कोयता आणि तलवार घेऊन दरोडेखोर घुसले. त्यांनी आम्हाला धमकावले आणि घरातील सर्व मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले, असे हातोंड येथील एका पीडिताने सांगितले. गावकरी या थरारक अनुभवाबद्दल बोलताना भीतीने थरथरत होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गावकऱ्यांचा सुरक्षिततेवरचा विश्वास डळमळीत झाला आहे.
कडक कारवाई व सुरक्षेची गावकऱ्यांची मागणी
या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाई आणि गावात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. आमच्या गावात रात्री पोलीस गस्त नाही. जर नियमित गस्त असती, तर कदाचित ही घटना टाळता आली असती, असे माठळ गावातील रहिवाशांनी सांगितले. गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला गावातील सुरक्षाव्यवस्था सुधारण्याची विनंती केली आहे.
रायगड: गळ्यावर कोयता अन् तलवारीचा धाक! सशस्त्र टोळीचा धुमाकूळ
