रत्नागिरी : जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दहा लाख किमी धावलेल्या जुन्या गाड्या मोठ्या प्रमाणात भंगारात काढल्याने शहरी व ग्रामीण फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. बसअभावी वारंवार फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांना तासन्तास बसस्थानकावर थांबावे लागत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता फेऱ्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी परवड होत आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी किंवा सायंकाळी परतण्यासाठी ठरलेल्या फेऱ्या अचानक बंद पडतात. यामुळे विद्यार्थ्यांना पायी जाणे किंवा महागडी खासगी वाहने वापरणे भाग पडत असून वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या गाड्यांची वयोमर्यादा संपल्याने त्या भंगारात काढल्या गेल्या किंवा दुरुस्तीअभावी डेपोत उभ्या आहेत. त्यामुळे आवश्यक तेवढ्या गाड्या उपलब्ध नसल्याने दैनंदिन वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, रत्नागिरी बसस्थानकाला ‘स्मार्ट’ स्थानकाचा दर्जा मिळाला असला तरी वाहतूक मात्र गोंधळलेलीच आहे. प्रवासी आणि पालकवर्ग यांची मागणी आहे की, एसटी महामंडळाने तातडीने नवीन गाड्या उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.
रत्नागिरीतील एसटी सेवा कोलमडली; प्रवाशांवर तासन्तास बसस्थानकात थांबण्याची वेळ
